Breaking News

पुलवामात मारले गेलेेले अतिरेकी पाकिस्तानी


श्रीनगर, लखनऊ: कुलगाम येथे झालेल्या चकमकीत तिघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यातील दोघे हे पाकिस्तानचे नागरिक असून ते ‘जैश- ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे कमांडर आहेत. या वेळी ठार केलेल्या तिसर्‍याचाही अनेक दहशतवादी कारवायामध्ये हात होता, अशी माहिती जम्मू- काश्मीर पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात अटक करण्यात आलेल्या काश्मिरी युवकांचा पुलवामा हल्ल्यातील सूत्रधारांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.

रकीब अहमद शेख (शिंगनपोरा, कुलगाम), वालिद, नूमन (दोघेही पाकिस्तानचे नागरिक) अशी तिघा दहशतवाद्यांची नावे आहेत. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात रविवारी उशिरापर्यंत चाललेल्या चकमकीत पोलिस उपअधीक्षक अमन ठाकूर आणि सैन्यदलाचा एक जवान हुतात्मा झाला. या चकमकी दरम्यान तिघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. चकमकीत ठार केलेले तिघेही दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’शी संबंधित आहेत. ते दक्षिण काश्मीरमधील खोर्‍यात दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होते. त्यांच्यावर नागरिक तसेच सुरक्षा दलांवर हल्ले केल्याप्रकरणी अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याकडून रायफल्स आणि अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

कुलगाम जिल्ह्यातील तुरीगाम भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली हाती. त्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली. या वेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. त्यात तिघा दहशतवाद्यांना मारण्यात आले; मात्र या चकमकीत पोलिस उपअधीक्षक अमन ठाकूर हुतात्मा झाले. या चकमकीत एक मेजर आणि दोन जवान जखमी झाले. गंभीर जखमी झालेले हवालदार सोमबीर हेदेखील नंतर हुतात्मा झाले.

अमन ठाकूर हे 2011 च्या काश्मीर पोलिस बॅचचे अधिकारी आहेत. गेल्या दीड वर्षांपासून ते कुलगाम येथील जम्मू-काश्मीर पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाचे नेतृत्व करत होते.

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘जैश-ए-मोहमद’चा काश्मीरमधील हस्तक अब्दुल गाझी याच्या आम्ही सातत्याने संपर्कात होतो, अशी कबुील उत्तर प्रदेशातील देवबंद येथून अटक करण्यात आलेल्या दोन काश्मिरी तरुणांनी दिली आहे. तसेच पुलवामा नंतर ‘जैश-ए-मोहमंद’ एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा बेत आखत होता, अशी माहितीही या दोघांच्या चौकशीतून मिळाली. शहनवाझ तेली आणि अब्दुल आकिब मलिक अशी या दोन काश्मिरी तरुणांची नावे आहेत. सहारनपूरजवळील देवबंद येथून या दोघांना उत्तर प्रदेश दहशतवादी प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या दोघांचे मोबाइल तपासल्यानंतर त्यातून काही व्हॉइस मॅसेजेसमध्ये बडा काम (दहशतवादी हल्ला) आणि सामान ( शस्त्र) असे शब्द वापरले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आपण ‘जैश-ए-मोहमंद’च्या संपर्कात असल्याचे दोघांनीही कबूल केले आहे. शहनवाझ तेली कुलगावचा असून तो बी.ए प्रथम वर्षाला आहे तर आकिब पुलवामाचा असून त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. हे दोघंही बीबीएम या सोशल साइटच्या माध्यमातून ‘जैश’च्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होते. पुलवामा प्रकरणी या दोघांचा काही हात होता का, याचा तपास उत्तर प्रदेश एटीएस करते आहे.