Breaking News

पाथर्डी शहरातील धोकादायक गतिरोधक हटवावीतअभिजित खंडागळे
पाथर्डी ः पाथर्डी शहरातील नव्याने होत असलेल्या गोपीनाथ मुंडे जॉगींग पार्क समोरच असलेले धोकादायक वळण व तेथे असलेला अरुंद पूल तसेच माणिकदौंडी गावाजवळील तीव्र वळण व उतार यामुळे या भागात अपघातांची मालिकाच सुरु असल्याचे पुरावे सादर करत या महामार्गाचे काम दर्जेदार व उत्कृष्ट पद्धतीने होऊन या महामार्गावर असणारी धोकादायक वेडीवाकडी वळणे, तीव्र चढउतार हटवावीत व या दुष्काळी भागाला समृद्धीकडे नेणार्‍या या महामार्गरुपी जीवनदायीनीचे काम उत्कृष्ट पद्धतीने व्हावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या नेतृत्वाखाली परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण शिरसाट, शहराध्यक्ष सुभाष घोरपडे, सचिव संदीप काकडे यांनी या भागातील रा.म.54 या महामार्गाची जबाबदारी असणारे सा. बा. विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.दत्तात्रय क्षीरसागर यांच्याकडे जोरदार मागणी निवेदनाव्दारे केली आहे.
अमरापुर-बारामती राज्य महामार्ग क्र. 54 चे रस्ता रुंदीकरण, भरीव व पुलांची कामे सध्या सुरू असून पाथर्डीसह तालुक्यातील माणिकदौंडी व कडा, आष्टी या डोंगराळ व कायम दुष्काळी पट्ट्यातून हा राज्य महामार्ग जात आहे. या मार्गापैकी अमरापुर ते पाथर्डी हा मार्ग बहुतांश सपाट भूमीवर असून पाथर्डी ते कडा या मार्गावर बहुतांश डोंगराळ व खडकाळ भाग आहे. या भागात सध्या अस्तित्वात असलेला मार्ग हा जून्या काळातील असंख्य वेडीवाकडी वळणे, चढ-उतारासह बैलगाडीसाठी असलेला गाडी रस्ता होता. त्यावरच खडीकरण होऊन त्याचे रुपांतर इतर जिल्हा मार्गात व कालांतराने प्रमुख जिल्हा मार्गात झाले, याच रस्त्याचे रुपांतर आता राज्य महामार्गात झाले असून या गाडीरस्त्यावरची अपघाताला निमंत्रण देणारी शेकडो धोकादायक वळणे, चढउतार व खळगे तशीच्यातशीच ठेवत या महामार्गाचे काम सध्या जोरात चालू आहे. अशाप्रकारे धोकादायक वळणे असलेला हा महामार्ग झाला तरीही त्यावरुन प्रवासी व अवजड वाहने प्रवास करणे टाळून इतर लांबच्या मार्गावरुन प्रवास करतील व पर्यायाने पाथर्डी सारख्या कायम दुष्काळी व डोंगराळ भागातील जनतेला समृद्धीकडे नेणार्‍या या महामार्गाच्या निर्मितीवर शासनाचा अतोनात खर्च होऊनही वाहतुकीअभावी तो वाया जाणार आहे. या वेड्यावाकड्या वळणामुळे अपघातांची संख्याही वाढणार आहे. राज्य महामार्गावरील बहुतांश वेडीवाकडी वळणे ही कुठल्याही प्रकारच्या भुसंपादनाशिवाय सहजरीत्या हटवणे शक्य असतानाही तो पुर्वीच्याच गाडी रस्त्याने नेत या महामार्गाचे काम उरकण्याचे प्रयोजन का..? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.
यावेळी क्षीरसागर यांनी मनसेच्या मागणीनूसार या भागातील महामार्गावरची अशा प्रकारची जास्तीत जास्त वळणे हटवून व काही ठिकाणी भुसंपादन करण्याची आवश्यकता असल्यास तसा प्रस्ताव शासनाकडे मांडुन हा राज्य महामार्ग दर्जेदार करण्याचे आश्‍वासन दिले.