Breaking News

उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल माधुरी तिखे यांचा नागरी सत्कार


कर्जत /प्रतिनिधी: कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द येथील माधुरी विठ्ठल तिखे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली त्याबद्दल चांदे खुर्द ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
सरपंच प्रल्हाद सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य जया सूर्यवंशी, पोलिस पाटील वैशाली तिखे,सामाजिक कार्यकर्ते रामदास सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना माधुरी तिखे म्हणाल्या, ग्रामीण भागातील मुलींनी शिकून करिअर करायला हवे.वडिलांचे छत्र हरवलेले व आर्थिक परिस्थिती बिकट असताना आईने संघर्ष करीत भावाबरोबर मला चांगले शिक्षण दिले.आयुष्यात काहीतरी चांगले करायचे या ध्येयाने अभ्यास करत राहिले. आईची मेहनत आणि माझे कष्ट तसेच पुण्यातील प्राध्यापक सचिन हिसवनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले यामुळे राज्यात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती वर्गातून मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळाला.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गावाचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

या कार्यक्रमासाठी चमक सूर्यवंशी,सुभाष सुर्यवंशी,युवराज सुर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, महेंद्र सूर्यवंशी, संदिप सूर्यवंशी ,बापू गुरव, रहेमान सय्यद,भरत सूर्यवंशी, गणेश तिखे, गोकुळ तिखे,  हनुमंत गावडे,विनोद गंगावणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.