Breaking News

दखल भाग 10 - विखे मोठे, की पक्ष?


राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरची जागा प्रतिष्ठेची केली. जागा वाढण्यासाठी माझा आग्रह होता, मुलासाठी नाही, असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सांगत आहेत; परंतु डॉ. सुजय विखे यांना राष्ट्रवादीत जाऊनही आघाडीचा जागा राखता आली असती. सुजय यांनीच राष्ट्रवादीत जायला नकार दिल्यामुळं राष्ट्रवादीनं त्यांच्या कलानंच सारं घेण्याचं कारणच उरत नाही. वास्तविक या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद जास्त असताना काँग्रेससाठी तो सोडण्याचा अट्टहास तरी कशासाठी होता, हा प्रश्‍न उरतोच.

नगर लोकसभा मतदारसंघाचा विषय देशभर गाजतो आहे. 1991 मध्येही हा मतदारसंघ चर्चेत आला होताच. त्या वेळी बाळासाहेब विखे यांना पक्षविरोधी कृत्याची शिक्षा म्हणून कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारून ती शंकरराव काळे यांना देण्यात आली होती. कोपरगाव हा बाळासाहेबांचा हक्काचा मतदारसंघ. 1971 पासून ते त्या मतदारसंघातून निवडून येत होते. काळे यांना उमेदवारी मिळाल्यामुळं त्यांना काँग्रेसवर सूडच उगवायचा होता, तर तिथून उभं राहायचं; परंतु तसं न करता त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. यशवंतराव गडाख यांनी त्यांचा पराभव केला. नगर लोकसभा मतदारसंघात एकही नेता नाही, की जो या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करील? यशवंतराव गडाख, तुकाराम गडाख हे जरी उत्तरेकडचे होते, तरी त्यांची गावं त्या वेळी नगर लोकसभा मतदारसंघात होती, हे लक्षात घेतलं, तर ते उपरे ठरत नाही. चंद्रभान आठरे हे नगरचे खासदार होते. ते तर बाळासाहेबांचे निकटवर्तीय. गडाख, आठरे आणि दादा पाटील शेळके आदी काहींचा अपवाद वगळता बाकीचे खासदार हे बाहेरचेच होते. नगर लोकसभा मतदारसंघानं बाहेरची अतिक्रमणं अशी कितीवेळा सहन करायची? अण्णासाहेब शिंदे हे ही नगरमधूनच निवडून जात होते. प्रा. ना. स. फरांदे यांच्यासारखा चांगला वक्ता असलेला आणि या जिल्ह्याचा जावई असलेला उमेदवार उपरा म्हणूनच पराभूत केला होता, याची आठवण यानिमित्तानं होते. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सार्‍याच पक्षांनी नगरवर बाहेरून उमेदवार का लादावेत, असा प्रश्‍न उपस्थित होतो. नगर लोकसभा मतदारसंघात राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदे, जामखेड, कर्जत, पाथर्डी, शेवगाव या आठ तालुक्यांचा समावेश होतो. या आठ तालुक्यात सर्वंच पक्षात तगडे नेते असताना त्यांना उमेदवारी देण्याऐवजी उत्तरेची आक्रमणं का स्वीकारायची, या मतदारसंघाची म्हणून काही अस्मिता आहे, की नाही, याचा विचार सर्वंच राजकीय पक्षांनी नाही केला, तरी मतदारांनी करणं आवश्यक आहे. नगर जिल्ह्याचा असमतोल विकास झाला, असं म्हणायचं आणि जिल्हा बँक, जिल्हा परिषद तसंच अन्य बाबतीतही कायम उत्तरेचं आक्रमण खपवून घ्यायचं, हे किती काळ चालणार? सदाशिव लोखंडे वगळता दक्षिणेतील किती नेते उत्तरेत जाऊन यशस्वी झाले, याचं उत्तर नकारार्थी आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातला सामाजिक स्तर आणि मोदी यांची लाट यामुळं लोखंडे यांची लॉटरी लागली, हे विसरता येणार नाही.
नगर लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. त्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत, तर शिवसेनेचा एक आमदार आहे. भाजपचे तीन आमदार आहेत. जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. आता विखे भाजपत गेल्यानंतर भाजपच्या सदस्यांची संख्या वाढणार आहे. नगर महापालिकेत भाजपची सत्ता असली, तरी शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक आहे. आता काँग्रेसचे तीन नगरसेवकही भाजपच्या कच्छपि लागतील. पारनेर पंचायत समिती वगळता काँग्रेसच्या ताब्यात एकही संस्था नव्हती. तरी राष्ट्रवादी तीनदा पराभूत झाली, म्हणून काँग्रेसला हा मतदारसंघ सोडावा, असा अट्टहास विखे गेल्या दोन वर्षांपासून धरीत होते. मतदारसंघ सोडण्याऐवजी त्यांनीच राष्ट्रवादीत जाऊन हा मतदारसंघ निवडून आणून देतो, अशी भाषा वापरली असती, तर कदाचित फार पूर्वीच त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला असता; परंतु त्यांना सारंच आपल्या मनाप्रमाणं व्हावं असं वाटतं. खरं तर पक्षापेक्षा विखे यांना मोठं समजण्याची चूक भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना असे सारेच पक्ष करीत आहेत. पक्ष मोठा असतो, व्यक्ती नाही; परंतु विखे यांचं उपद्रवमूल्य लक्षात घेऊन त्यांना मोठेपण देण्यात आतापर्यंत सर्वांनी धन्यता मानली. जिल्ह्यात विखे यांच्यापेक्षा कितीतरी मोठी पदं भूषवणारे नेते झाले; परंतु त्यांनी आपण पक्षापेक्षा मोठं आहोत, असं कधीच दाखविलं नाही. तीन पक्षांचं राज्यपातळीवरील नेतृत्त्व एकाच वेळी नगर जिल्ह्यातील नेत्यांनी केलं; परंतु त्यांनी कधीच तसं दाखविलं नाही. विरोधी पक्षनेतेपदही नगर जिल्ह्याकडं पहिल्यांदाच आलं असं नाही. एकाच घरात एकाचवेळी सर्व पदं असं फारच अपवादात्मक परिस्थितीत झालं. विखे यांच्याबाबतीत ते वारंवार झालं. तरीही पक्ष अडचणीत असताना त्याला आणखीच अडचणीत आणण्याचं काम विखे यांनी केलं. एकाच रात्रीत भूमिका कशा बदलतात, हे ही विखे यांच्यापासूनच समजतं. गेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या नगर महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी याच सुजय विखे यांनी भाजपला संघटित गुन्हेगारांची टोळी असं म्हटलं होतं. आता त्याच टोळीत ते सहभागी झाले आहेत. सर्जिकल स्ट्राईकमुळं मी भाजपत आलो, असं ते म्हणत आहेत. ते ही धादांत खोटं आहे. 26 फेबु्रवारीला बालाकोटचा हल्ला झाला. त्यानंतर भाजपत प्रवेश करण्यासाठी त्यांनी इतका वेळ का लावला, असा प्रश्‍न उपस्थित होतो. सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका घेणार्‍यांची गणना ते देशद्रोह्यांत करतात. राधाकृष्ण विखे यांनीही सर्जिकल स्ट्राईकबाबत पुरावे मागितले होते. त्यांनीही शंका उपस्थित केली होती. त्यांनाही सुजय आता देशद्रोही ठरविणार का, या प्रश्‍नाचं उत्तर त्यांना जनतेनं मागायला हवं.

नगर लोकसभा मतदारसंघातही विखे यांचे सवते सुभे आहेत. या सुभ्यांनी आतापर्यंत मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, प्रा. राम शिंदे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. राजीव राजळे यांच्या पराभवाला विखेही जबाबदार होते, हे त्यांच्या कुटुंबाला चांगलंच माहीत आहे. पाथर्डी-शेवगावमध्ये हर्षदा काकडे यांना बळ देताना त्यांनी राजळे, घुले, ढाकणे यांच्याविरोधात राजकारण केलं. आताही अभय आव्हाड यांना ताकद देण्याचं काम विखे करीत आहेत. पारनेरमध्येही विखे यांचा स्वतंत्र गट आहे. विखे यांचे हे गावोगावचे गट जेव्हा भाजपत सहभागी होतील, तेव्हा भाजपच्या मूळ निष्ठावंताचं काय, असा प्रश्‍न पडतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना तरी मनापासून विखे मान्य आहेत का, याचं उत्तर ते कृतीतून देतील. खा. दिलीप गांधी यांच्याबाबत अन्य काही प्रवाद असतील, तरी त्यांनी कोणत्याही तालुक्यात आपला स्वतंत्र प्रबळ गट निर्माण केला नाही. ज्या ठिकाणी त्यांचे गट होते, तिथं ते स्थानिक आमदारांना आव्हान देऊ शकतील, अशी स्थिती नव्हती. विखे यांच्या गटाचं तसं नाही. ते थेट विधानसभेतील सध्याच्या आमदारांनाच आव्हान देऊ शकतील. नाही आव्हान देऊ शकले, तरी त्यांचा पूर्वानुभव लक्षात घेता ते कुणाला निवडून आणलं नाही, तरी ज्यांना निवडून येऊ द्यायचं नाही, त्यांना पाडू शकतात. तालुक्यात समांतर संघटना उभी राहू शकते. आताही सुजय यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांना फारसं महत्त्व न देता त्यांच्या पूर्वीच्या स्टाईलप्रमाणं देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, पंकजा मुंडे-पालवे, महादेव जानकर, प्रा. राम शिंदे यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. वरच्या नेत्यांना सांभाळलं, की खालची संघटना आपल्या मनाप्रमाणं वाकविता येते, हे त्यांना चांगलंच माहीत आहे. भाजपच्या संस्कृतीत ते बसतं का, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.
(समाप्त)