Breaking News

जामखेडला पाणी टंचाईचे संकट ; 11 टॅकर चालू


जामखेड/प्रतिनिधी
जामखेड शहरात 12 दिवसाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तो अपूर्ण पडत असल्याने नगरपालिका हद्दीतील जांबवाडी, सदाफुले वस्ती, चुंबळी, झोपडपट्टी, राळेभात वस्ती, धोत्री, बटेवाडी, निमोणकर वस्ती येथे 11 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून शहरासाठी आणखी 33 टँकर मागणीचा प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांना देण्यात आला आहे.
अत्यल्प पाऊसामुळे भुतवडा तलावात पाणी साठा कमी झाल्याने जामखेड शहरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होत आहे. सध्या भुतवडा तलावाची पाणी पातळी खालावली आहे. शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने पाणीपुरवठा योजनेच्या जलस्त्रोतासह खासगी जलस्त्रोत, शासकीय हातपंप पाण्याअभावी बंद आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या भुतवडा तलावाची निर्मिती 1970 मध्ये झाली असून 119 दशलक्ष घनफूट साठवण क्षमता आहे. मात्र, शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा क्षमता कमी आहे. तलावातील पाणी पातळी खालावल्याने तलावात असलेल्या खड्ड्यांमध्ये दोन विद्युत मोटारी द्वारे चारित नंतर पाण्याच्या टाकीत सोडले जात आहे. नंतर नळाद्वारे नागरिकांना पाणी मिळत आहे. याचा शहरावर मोठा ताण पडत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. शहरात अनेक ठिकाणी भुमिगत गटारींचे काम चालू असल्याने पाण्याची पाईपलाईन तर कुठे नळ तुटत असल्याने होणारी पाणी गळतीकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न चालू आहेत. तरी नागरिकांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करून नगरपालिकेला सहकार्य करावे -अमित चिंतामणी-सभापती पाणीपुरवठा