Breaking News

‘जमाते’च्या आणखी 15 जणांना अटक; 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; आतापर्यंत 370 जण अटकेत


नवी दिल्लीः ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेच्या आणखी 15 जणांना अटक करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. याव्यतिरिक्त 52 कोटी रुपयांची संपत्तीही जप्त करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्चपासून ते आतापर्यंत ‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेशी संबंधित असलेल्या 370 हून अधिक जणांविरोधात अटकेची कारवाई केली गेली आहे.
दहशतवादाचे कंबर मोडण्यासाठी केंद्र सरकारकडून वारंवार कठोर पावले उचलली जात आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर तर दहशतवादविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी कनेक्शन असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’वर पाच वर्षांपर्यंत बंदी घातली. जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी(3 मार्च) जमात-ए-इस्लामी (जम्मू काश्मीर)संघटनेशी संबंधित असलेला सैयदपुराचा माजी जिल्हा अध्यक्ष बशीर अहमद लोनसहीत त्याचे अन्य साथीदार अब्दुल हामिद फैयाज, जाहिद अली, मुदस्सीर अहमद, गुलाम कादीर, मुदासीर कादीर, फैयाज वानी, जहूर हकाक, अफजल मीर, शौकत शाहीद, शेख जाहिद, इमरान अली, मुश्ताक अहमद आणि अजक्स रसूलला अटक करण्यात आली. या संघटनेची 52 कोटी रुपयांची संपत्ती तपास यंत्रणांनी जप्त केली आहे.


या संघटनेशी संबंधित असणार्‍यांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेवर बंदी घातली. ‘जमात-ए-इस्लामी’चा दहशतवादी संघटनांशी संबंध असून, देशात अनेक ठिकाणी विघातक कारवाया घडवण्यात, काश्मीर खोर्‍यात दहशतवाद पसरवण्यात ही संघटना जबाबदार असल्याचा आरोप आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी या संघटनेच्या म्होरक्यांना आणि हस्तकांना अटक केली. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.


‘जमात ए इस्लामी’ची स्थापना 1941मध्ये करण्यात आली. त्यानंतर ‘जमात ए इस्लामी’ वेगवेगळ्या संघटनांमध्ये विभागली गेली. ज्यामध्ये ‘जमात-ए-इस्लामी पाकिस्तान’ आणि ‘जमात-ए-इस्लामी हिंद’चा समावेश होता. जमात-ए-इस्लामीपासून प्रभावित होऊन कित्येक संघटना स्थापन करण्यात आल्या. त्यामध्ये जमात-ए-इस्लामी बांग्लादेश, काश्मीर, ब्रिटन आणि अफगाणिस्तान इत्यादी संघटनांचा समावेश आहे. ‘जमात-ए-इस्लामी’वर यापूर्वी 1975 मध्ये दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 1990 मध्येही केंद्र सरकारने बंदी घातली होती. 1971 मध्ये या संघटनेने सक्रीय राजकारणात प्रवेश केला होता.

‘जमाते’ चा ‘हिज्बुल’ शी संबंध

काश्मीर खोर्‍यात ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ला उभे करण्यात ‘जमात-ए-इस्लामी’ने मदत केली. तसेच, ही संघटना ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ संघटनेचा उजवा हात आहे, असेही म्हटले जाते.