Breaking News

लोकसभेचा बिगुल वाजला; आंध्र प्रदेश, सिक्कीम विधानसभेच्याही निवडणुका, महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान; 23 मे रोजी मतमोजणी


नवीदिल्लीः निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. सात टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात 11, 18 23 व 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभेसह निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश, सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकांचीही घोषणा केली. या दोन राज्यात लोकसभेसोबतच विधानसभेसाठी मतदान घेतले जाईल. 

दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सविस्तर माहिती दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सर्वच मंत्र्यांना विकासकामांची उद्घाटने आठ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे बजावले होते. त्यामुळे 9 मार्चला निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती; मात्र हा अंदाज खोटा ठरला असून आयोगाने रविवारी निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.
 
या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. सोबतच, मतदारांना यावेळी नोटाचा अधिकार सुद्धा वापरता येईल. लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, 2014 च्या तुलनेत मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकूण 90 कोटी मतदार यंदा आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यंदा निवडणुकीच्या तारखा जाहीर करत असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि शेतीतील हंगामाचा अंदाज घेऊन तारखा ठरवण्यात आल्या आहेत,अशी माहिती अरोरा यांनी दिली. मतदान यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी एक हेल्पलाईनही तयार करण्यात आली आहे. यंदा मतदान यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी 1590 क्रमांकावर फोन करू शकतात. तसंच अंध मतदारांसाठी मतदार यादीही ब्रेन लिपीत असणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने एक अ‍ॅपही तयार केले आहे. आचारसंहितेचा भंग कळवण्यासाठी विशेष अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. कुठेही लोकांना जर अनुचित प्रकार आढळून आला, तर त्यांना या अ‍ॅपवर निवडणूक आयोगाला घटनेची माहिती कळवता येईल.

महाराष्ट्रातील मतदानाच्या तारखा
पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे. यानंतर दुसर्‍या टप्प्यातील मतदान 18 एप्रिल, तिसर्‍या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल, चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल, पाचव्या टप्प्यातील मतदान 6 मे, सहाव्या टप्प्यातील मतदान 12 मे आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी पार पडणार आहे. यानंतर 23 मे रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येतील. महाराष्ट्रात 4 टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत. 11 एप्रिल रोजी 7 जागांवर मतदान, 18 एप्रिल 10 जागांवर मतदान, 23 एप्रिल 14 जागांवर मतदान तर 29 एप्रिल 17 जागांवर मतदान होईल.


आकडे बोलतात
- 90 कोटी लोक बजावणार मतदानाचा अधिकार
- दीड कोटी मतदारांचे वय 18-19 वर्षे,
-1.60 कोटी नोकरीपेशा मतदार
- लोकसभेत प्रथमच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार
- 10 लाख पोलिंग स्टेशन
- मतदानाच्या 48 तासांपूर्वी बंद होणार ध्वनिक्षेपक
- रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाउडस्पीकरवर बंदी
- अधिक माहितीसाठी आयोगाकडून 1950 हेल्पलाइन
- ईव्हीएमच्या हालचालींवर जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिमने नजर ठेवणार
- संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची, मतदानाची व्हिडिओग्राफी
-पेड न्यूज विरोधात सक्त कारवाई करणार
- सोशल मीडिया पोस्टवर सुद्धा निवडणूक आयोगाची करडी नजर


2014 च्या लोकसभेचे चित्र...
ःःःःःःःःःःःःः
2014 च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यकाळ 3 जून रोजी संपुष्टात येत आहे. 543 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेत बहुमताचा आकडा 272 आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तब्बल 282 जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे सध्या 336 जागा आहेत. लोकसभेत विरोधी पक्ष नेता होण्यासाठी राजकीय पक्षाला सभागृहात किमान 10 टक्के जागा जिंकाव्या लागतात; परंतु 10 वर्षे राज्य करणार्‍या काँग्रेसला त्या निवडणुकीत फक्त 44 जागा मिळाल्या.


रविवारी निवडणुकीची घोषणा होण्याची पुनरावृत्ती
निवडणूक आयोगाकडून सहसा रविवारी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जात नाही, तरीही आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी रविवारचा दिवस निवडला आहे. यापूर्वी 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा रविवारीच करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होईल, अशी शक्यता वर्तवली होती.