Breaking News

शेणोलीत बँक ऑफ महाराष्ट्रवर 23 लाखांचा सशस्त्र दरोडा;हवेत गोळीबार करून चार ते पाच जणांनी सोनेही पळविले


कार्वे/कराड(प्रतिनिधी)- शेणोली (ता. कराड) येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर हवेत गोळीबार करून सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना सोमवारी(दि.11) दुपारी साडेतीन वाजता घडली. त्यामध्ये चार ते पाच दरोडेखोरांनी 23 लाख रूपये व अंदाजे दहा तोळे सोने चोरून नेले आहे.

कराड- तासगांव रोडवर असणार्‍या शेणोली स्टेशन येथे बँक ऑफ महाराष्ट्र बॅकेची शाखा आहे. येथे चार ते पाचजण चारचाकी गाडीतून आले होते. त्यांनी बँकेत प्रवेश करून खातेदार व बँक कर्मचारी यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मोबाईल व रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर त्यांनी पलायन करताना बँकेच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून घेतली. त्यामुळे लोकांच्या लक्षात हा प्रकार लवकर आला नाही.

ग्रामस्थांना माहीती मिळताच त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. तेव्हा तातडीने पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, तालुका पोलीस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाले होते. परिसरात माहीती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्याठिकाणी पोलिसांनी बंदोबस्तात मोठा केला होता. तसेच ठिकाठिकाणी वाहनांची तपासणी व मुख्य मार्गावर नाकाबंदी करण्यात आली होती.

दरोडेखोरांनी बँकेतील अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांना रूममध्ये कोंडून ठेवले होते. त्यानंतर कॅश केबिनमधील व स्ट्रॉँग रूममधील 23 लाख रूपये रक्कम व दहा तोळे सोने नेल्याची प्राथमिक तपासात समजत होते. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांसी संपर्क करता येवू नये म्हणून काही मोबाईलही नेले आहेत.