Breaking News

दखल- विखे मोठे, की पक्ष?- भाग 4


सोईचं राजकारण ही विखे घराण्याची खासीयत आहे. जे मिळत नाही, ते मिळवण्यासाठी दबावाचं राजकारण करायचं, पक्षाला आपल्यापुढं झुकायला लावायचं, ही त्यांची कार्यपद्धती. आपलं राजकारण किती चांगलं आहे, हे जनमाणसांवर बिंबवण्यासाठी काही बोरूबद्दादरांना पोसायचं आणि स्वकीयांचीच त्यांच्या माध्यमातून बदनामी करायची किंवा त्यांना कमी लेखायचं, अशी असुरी वृत्ती आहे.


बाळासाहेब थोरात हे विखे यांच्यापेक्षा एक दशक अगोदर विधिमंडळाच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांची सुरुवात जरी काँग्रेसविरोधात बंडखोरी करून झाली असली, तरी नंतर मात्र त्यांनी कधीच काँग्रेस पक्ष सोडला नाही. त्यांच्यावर विखे कायम घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप करीत राहिले, जरी विखे स्वतःच घराणेशाहीचे राजकारण करीत होते, तरी. विखे आणि थोरात यांच्या ताब्यातील संस्थांची कायम तुलना होत राहिली. थोरात यांनी संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना अतिशय चांगला चालविला. मद्याचं उत्पादन न करताही त्यांनी इतर कारखान्याच्या तुलनेत चांगला भाव दिला. संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे कारखान्याच्या भावाची सातत्याने तुलना होत राहिली. विखे यांच्या कारखान्याच्या तुलनेत दरवर्षी सरासरी दोनशे रुपयांनी तरी कमी भाव मिळत गेला. विखे कारखान्याचे आणि संगमनेर कारखान्याचे कार्यक्षेत्र शेजारी शेजारी आहे. त्यामुळे अशी तुलना विखे यांना कायम अस्वस्थ करायची. संगमनेर दूध संघ राज्यात नावाजलेला. स्वतःच्या दुधाचे मार्केटिंग त्यांनी राज्यपातळीवर केलं. राजहंस दुधाची चव मराठवाडा, विदर्भ, मुंबई, तसंच राज्याच्या बर्‍याच भागात पोचली. थोरात यांनी नगर जिल्ह्यातील नेत्यांशीच नव्हे, तर राज्यातील नेत्यांशी सातत्यानं जुळवून घेतलं. अगदी विखे यांच्या अतिशय जवळच्या असलेल्या बी. जे. खताळ यांच्यांशीही त्यांनी कधी दुरावा निर्माण केला नाही. थोरात आणि खताळ पाटील हे वेगवेगळ्या गटाचे असले, तरी थोरात यांनी कधीच कुणाला फार त्रास दिला नाही. संगमनेरमध्ये वेगवेगळ्या संस्था उभ्या राहिल्या. परस्परांच्या राजकीय विरोधक असलेल्यांनीही संस्थांत निकोप स्पर्धा केली. असं असलं, तरी विखे यांनी मात्र कायम आश्‍वी आणि अन्य भागांत कायम थोरात यांच्याविरोधात भूमिका घेतली. पद्मश्री विखे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात विखे काम करीत असल्यानं त्यांना विरोध करण्याची भूमिका थोरात यांनी घेतली नाही; परंतु असं असलं, तरी बाळासाहेबांपासून राधाकृष्ण विखे आणि आता डॉ. सुजय विखे यांनी थोरात यांच्याविरोधात त्यांच्याच तालुक्यात जाऊन त्यांच्याविरोधात कायम आरोपांची राळ उडविली. अगदी वरिष्ठ नेत्यांनी सांगूनही विखे यांनी थोरात यांच्याशी फारसं जुळवून घेतलं नाही. थोरात यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जुळवून घेतलं. राष्ट्रवादीच्या मधुकरराव पिचड यांच्यांशी त्यांचं जसं जमलं, तसं शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे यांच्यांशीही त्यांचं जमलं. यशवंतराव गडाख यांच्यांसोबत तर त्यांचे सूर चांगलेच जुळले होते. श्रीगोंद्यात अगोदर कोल्हे यांनी शिवाजीराव नागवडे यांना बळ दिले. त्या वेळी कोल्हे यांनी कधीही नागवडे कोणत्या गटात आहेत, याचा विचार केला नाही. नंतर थोरात यांनी नागवडे यांना साथ दिली. थोरात यांनी कधीही स्वतः चा म्हणून गट तयार केला नाही. त्यांचे सर्वपक्षीयांशी जवळून संबंध राहिले; परंतु काँग्रेसशी कधीही प्रतारणा केली नाही. त्यामुळं तर त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कृषी, जलसंधारण, शिक्षण, महसूल आदी पदं मिळत गेली; परंतु विखे यांना ठराविक मर्यादेपर्यंत पक्षानं मोठं होऊ दिलं नाही. त्याचं कारण त्यांनी थोरात यांच्यासारख्यांना कायम त्रास दिला. 

संगमनेर तालुक्यात बाळासाहेबांनी पूर्वी पंढरीनाथ सहाणे मास्तर, साहेबराव नवले, वसंतराव गुंजाळ, आबासाहेब थोरात अशा अनेकांना मदत केली. बाळासाहेबांच्या पराभवासाठी रसद पुरवली; परंतु बाळासाहेबांनी संगमनेर मतदारसंघाची केलेली बांधणी, सामान्यांच्या संसाराला लावलेला हातभार, संस्थांचा चांगला कारभार यामुळं त्यांची प्रतिमा कितीही मलीन करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यावर त्यांनी मात केली. अगदी त्यांच्याविरोधात एका प्राध्यापिकेच्या आत्महत्येचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात कसं नेण्यातआलं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामागं कोणाचा मेंदू होता आणि आर्थिक ताकद कोण पुरवितं होतं, हे ही सर्वज्ञात आहे. संगमनेरच्या संस्था चांगल्या चालत असताना प्रवरानगर परिसरातील सहकारी संस्था अडचणीत का येतात, या मागचं कोडं उलगडणं फारसं अवघड नाही. विरोधक आणि स्वकीयांविरोधात कायम कसं प्रतिकूल छापून येईल आणि आपली कृष्णकृत्यं कशी झाकली जातील, यासाठी माध्यमांना कोण, कसं हाताशी धरीत होतं, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या माध्यमांना जाहिरातीचा आणि तसाही वेळोवेळी अन्य मलिदा कोण पाठवित होतं, त्यासाठी पगारी पत्रकार कसे कार्यरत होते, याची जिल्ह्याला चांगलीच माहिती आहे. विखे यांची प्रसिद्धी यंत्रणा एकवेळ राज्यात अग्रेसर समजली जात होती. त्यामागंच कारण अर्थकारण हेच होतं. सध्याही असे पगारी बरेच माध्यम सल्लागार आहेत. त्यांचा केव्हातरी समाचार घेता येईल; परंतु आता विखे यांनी स्वतः ची प्रतिमा घडविताना दुसर्‍यांना कायम कसं उणं लेखलं, एवढ्यापुरता मर्यादित विषय आहे. 

बाळासाहेब थोरात यांना विखे कायमच पक्षांतर्गत स्पर्धक मानत आले. थोरातांना जास्त मताधिक्य मिळतं, मग आपल्याला का नाही, असं त्यांच्या मनाला कायम बोचत असतं. त्यामुळं विखे यांची यंत्रणा कायम थोरात यांच्याविरोधात कार्यरत असते. तळेगाव भागात सभा घ्यायच्या, तिथं दुष्काळी भागाचे मुद्दे काढायचे आणि त्याला थोरात कसे जबाबदार आहेत, असं सांगायचं. तरीही थोरात यांना एवढं मताधिक्य मिळतंच कसं, असं त्यांना सारखं वाटायचं. याउलट, विखे यांच्याविरोधात शिर्डी मतदारसंघातच प्रचंड नाराजी होती. एकवेळ अशी आली होती, की लोणी, कोल्हार, आश्‍वी परिसरातून त्यांना जास्त मतदान झालं नसतं, तर विखे यांचा पराभव झाला असता. बाळासाहेबांनी त्या वेळी विखे यांच्यासारखं ठरविलं असतं, तर कदाचित विखे यांचा त्यांना पडद्याआड राहून पराभव करता आला असता; परंतु त्यांनी तसं केलं नाही, तरी विखे यांच्या बाळासाहेबांविरोधातील कारवाया थांबलेल्या नाहीत. बाळासाहेब हे तसे राधाकृष्ण विखे यांच्यापेक्षाही राजकारणात ज्येष्ठ. तरीही एकवेळ राधाकृष्ण विखे यांनी केलेली त्यांच्यावरची टीका समजण्यासारखी आहे; परंतु सुजय विखे यांचं वय काय, त्यांचा राजकीय अनुभव काय,त्यांचं कर्तृत्त्वही अजून सिद्ध व्हायचं आहे. त्यांनी बाळासाहेबांवर अश्‍लाघ्य भाषेत टीका करावी, याला काय म्हणावं? बाळासाहेबांंवर पक्षाच्या नेतृत्त्वाचा प्रचंड विश्‍वास. बाळासाहेब कधीही केंद्रीय राजकारणात सक्रिय नसताना त्यांना राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचं पद दिलं गेलं. विखे यांची एवढी लोकप्रियता होती, नेते मॅनेज करण्याचं कौशल्य होतं, तर पक्षानं त्यांना हातचं राखूनच का दिलं? राहुल गांधी यांनी थोरात यांच्याकडं गुजरातची जबाबदारी दिली होती. गुजरात हे मोदींचं होमपीच. तिथं काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी पक्ष सोडलेला. अन्य आमदारही भाजपत गेलेले. काँग्रेसकडं उमेदवारी करायलाही कुणी तयार नव्हतं. अशा वेळी थोरात यांनी पक्षाच्या नेत्यांना विश्‍वासात घेतलं. राजीव सातव यांची मदत घेतली. पक्ष संघटना उभी केली. गलितगात्र झालेल्या पक्षाच्या पंखात बळ भरलं. गुजरातमध्ये काँग्रेसला काहीच मिळणार नाही, असं वातावरण असताना या पक्षानं भाजपपुढं मोठं आव्हान उभं केलं. मोदी आणि अमित शाह यांनी खोट्या प्रचाराचा आधार घेतला नसता, तर कदाचित गुजरात राज्यात भाजपची सत्ता आली असती; परंतु ते झालं नाही. बाळासाहेबांना काँग्रेसश्रेष्ठी एवढं महत्त्व देतात. त्यांचं अनेकदा प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव येतं, ते त्याला नकार देतात, तरीही त्यांचं नाव कायम चर्चेत राहतं, मुख्यमंत्रिपदाचे स्पर्धक म्हणूनही त्यांचं नाव घेतलं जातं. राधाकृष्ण विखे यांचं नाव का घेतलं जात नाही, याचं कारण शोधलं, तर पक्षापेक्षा विखे स्वतःला मोठं समजतात, हेच आहे.