Breaking News

कर्जत तालुक्यातील 40 गावे एसटी विना


कर्जत -देशाच्या स्वातंत्र्याने सत्तरी ओलांडली असली तरी नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचितच आहेत. कर्जत तालुका याला अपवाद नाही. दळणवळण सुविधांच्या अभावामुळे तालुक्यातील अनेक गावातील जनजीवन कायमच विस्कळीत राहिले आहे. कर्जत तालुक्यातील चाळीस गावात अजून राज्य परिवहन महामंडळाची बस जात नाही.नागरिकांना गावातून बाहेर पडायलाच मार्ग नसल्याने या भागातील विकासाच्या वाटा खुंटल्या आहेत.

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चारही गटातील अनेक रस्त्यांची मोठी बिकट अवस्था आहे. कुळधरण, राशीन, मिरजगाव, माहिजळगाव या सर्व भागातील चाळीसहून अधिक गावामध्ये अद्यापही एसटी बस पोहोचलेली नाही. जवळपास आठ ते दहा गावामध्ये दिवसातून फक्त एकदाच एसटी बस जाते. तर काही गावात फक्त जवळपास असलेल्या आठवडे बाजारच्या दिवशी एसटीचे दर्शन घडते. रस्त्यावर विस्कटलेली खडी, धुळीचे ढीग, दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे, खचलेले पूल, खोलवरचे खड्डे अशा येथील रस्त्यांच्या व्यथा संपता संपत नाहीत.

या सर्व प्रकारांमुळे गावातील मुलींवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली. ही मोठी शोकांतिका आहे. तळवडी, पावणेवाडी, ताजु, हिंगणगाव आदी भागातील रस्ते निर्मनुष्य असतात. त्यामुळे अनेक पालक मुलींना गावातील प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी बाहेर पाठवत नाहीत.

दुर्गम गावातील शेतकर्‍यांचा उत्पादीत शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यास अडचणी येत आहेत. बर्‍याच गावातील लोकांना आठवडे बाजार गाठण्यासाठी कित्येक किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. एसटी बसची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक भागात जनावरांचा वापर करुन वाहतुक केली जाते. तळवडी-धालवडी भागात हे चित्र पहावयास मिळते. रुग्णसेवेसाठी रात्री बेरात्री बैलगाडीचा वापर केला जातो.

एसटी सुविधांपासून असणारी वंचित गावे

करमनवाडी, तळवडी, पावणेवाडी, आखोनी, वायसेवाडी, गणेशवाडी, औटेवाडी, म्हाळंगी, देशमुखवाडी, कानगुडवाडी, तोरकडवाडी, कुरणाचीवाडी, परिटवाडी, ताजु, काळेवाडी, निंबे, शिंपोरा, करपडी, बाभूळगाव, पिंपळवाडी, कापरेवाडी, देमनवाडी, पठारवाडी, रवळगाव, बोंदर्डी, रातंजन, रोटेवाडी, थोटेवाडी, खैदानवाडी, गुंडाचीवाडी, पठारवाडी, सुपेकरवाडी, सोनाळवाडी, राक्षसवाडी खुर्द, हिंगणगाव, बेर्डी, चांदे खुर्द, थेटेवाडी, नांदगाव, मानेवाडी, जांभळवाडी

पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत

पालकमंञी प्रा.राम शिंदे यांनी आमच्या गावात ठेकेदार पोसण्यासाठी काही रस्त्यांची कामे केली. तर काही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आघाडी सरकारच्या काळात बसस्थानकाचे काम करण्यात आले. त्यावेळी अकरा बसेस नव्याने सुरू झाल्या. या अकरा बसेसपैकी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करून आमच्या गावातही एखादी बस द्यावी म्हणजे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे गैरसोय होणार नाही.
-रामदास सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते