Breaking News

अझहरच्या दोन भावांसह ‘जैश’च्या 44 अतिरेक्यांना अटक


इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर आणि नंतर प्रत्युत्तरात भारताने केलेल्या घुसून कारवाईनंतर चौफेर टीकेला सामोरे गेलेल्या पाकिस्तानला अखेर उपरती झाली आहे. कुख्यात दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मौलाना मसूद अझहरच्या दोन भावांसह 44 दहशतवाद्यांना जेरबंद केले. पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शहरयार आफ्रिदी यांनी या कारवाईची माहिती दिली.


मसूदचा भाऊ मुफ्ती अब्दुल रौफ आणि हमाद अझहर याच्यासह 44 जणांना अटक करण्यात आली आहे. कोणत्याही बाह्य दबावाशिवाय ही कारवाई करण्यात आल्याचा दावा शहरयार यांनी केला. बंदी घालण्यात आलेल्या संघटनांविरोधात ही कारवाई असल्याचे ते म्हणाले. पुलवामामध्ये झालेला हल्ला आणि त्यानंतर जैशच्या तळावर भारताकडून झालेल्या ‘एअर स्ट्राईक’नंतर पाकस्थित दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाब आला होता. भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकचा बुरखा फाडण्यासाठी मोहीमच हाती घेतली होती. त्यामुळेच मसूदच्या दोघा भावांना जेरबंद करण्यात आल्याचे जगजाहीर आहे. भारताने दिलेल्या यादीमध्ये या दोघांची नावे असल्याचे शहरयार खान यांनी सांगितले.

ही कारवाई पुढील दोन आठवडे चालूच ठेवण्यात येणार आहे. पुराव्यांच्या आधारावर ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोणाविरुद्ध दहशतवादी कारवाया पाकिस्तानच्या भूमीवरून होऊ देणार नाही, हे सरकारचे धोरण असल्याचे ते म्हणाले.

परराष्ट्र कार्यालयातील प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी सरकारची ही कारवाई म्हणजे बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानातील सर्व संघटनांची संपत्ती ताब्यात घेतल्यासारखे असल्याचे म्हटले आहे.