Breaking News

खामगावात दोन ठिकाणी घरफोडी 70 हजारांचा ऐवज पळविला;


 खामगाव,(प्रतिनिधी) : शहरातील सिव्हील लाईन परिसरात अज्ञात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. दोन ठिकाणी केलेल्या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल 70 हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला. यावेळी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करणार्‍या स्थानिकावर चारेट्यांनी दगडांचा प्रहार केला. संपूर्ण खामगाव शहरात दहशत पसरविणारी ही घटना 26 मार्चच्या उत्तररात्री 3 वाजता दरम्यान घडली.

शहरातील सिव्हील लाईन परिसरात डॉ. जगदिश जोशी यांचे घर असुन सदर घरात गजानन शामराव पवार (वय 50 वर्षे) हे भाडेकरु म्हणून राहतात. 25 मार्च रोजी सकाळी पवार आपल्या परिवारासह मडाखेड येथे काही कार्यक्रमानिमित्त गेले होते. पवार यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून 26 मार्च रोजी सकाळी 3 वाजताच्या सुमारास 3 बुरखाधारी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तेसच घरातील लोखंडी कपाट फोडून कपाटात ठेवलेली सोन्याची राजाराणी पोत अंदाजे वजन सहा ग्रॅम, 3 कानातील जोड, असे अंदाजे 15 ग्रॅम सोने आणि नगदी 3 हजार रुपये, असा एकुन 50 हजारांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा याच परिसरात राहणार्‍या गजानन जयकिसन भैय्या (वय 48 वर्षे) यांच्या घराकडे वळविला.

त्यांच्या घरातून एक मोटो कंपनीचा अंदाजे 14 हजार रुपये किमतीचा मोबाईल घेवून चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान, गजानन भैय्या यांना जाग आल्याने त्यांनी एका चोरट्याचा हात धरुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी भैया यांच्या दिशेने दगडांचा वर्षाव करुन आपल्या साथीदाराची सुटका करुन घूम ठोकली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सुरु आहे. घडलेल्या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन पोलिसांची रात्रगस्त वाढविण्याची मागणी होत आहे.