Breaking News

दखल विखे मोठे, की पक्ष? भाग 8विखे कुटुंबीय ज्या पक्षात जातं, तिथंही गटबाजी करतं. जुन्या निष्ठावंताना डावलून स्वकीयांचीच चलती करतं. आतापर्यंत विविध पक्षांनी तो अनुभव घेतला आहे. सत्तेसाठी भाजप काहीही करायला निघाला आहे, असा इशारा शिवसेनेनंच दिला आहे. सुजय यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असली, तरी शिवसेना व भाजपच्या नाराज नेत्यांची ते कशी मोट बांधणार, हा प्रश्‍न आहे.

बाळासाहेब विखे केंद्रीय अर्थराज्यमंत्री होते, तेव्हाची गोष्ट. त्यांना विविध बँका, वित्तीय संस्थांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचा अधिकार होता. भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची त्यांनी अशा संस्थावर वर्णी लावली असती, तर समजण्यासारखं होतं; परंतु तसं त्यांनी केलं नाही. प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, भागवतराव चंद्रे, राजेश परजणे, सुभाष डांगे, तानाजी धसाळ आदींची वर्णी वेगवेगळ्या बँका तसंच एलआयसीसारख्या संस्थेवर लावण्यात आली. त्या वेळी त्यांना शिवसेना व भाजपचा एकही जुना कार्यकर्ता योग्यतेचा दिसला नाही. विखे पितुपत्र जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा त्यांनी मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्था, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे कारखाना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साई संस्थान तसंच अन्य सरकारी समित्यांवर स्वकीयांचीच वर्णी लावली होती. मूळच्या युतीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावावी, असं त्यांना वाटलं नव्हतं. विखेविरुद्ध निष्ठावान असा संघर्ष होतो, तो याच कारणांमुळं. विखे यांच्याविरोधात बोलण्याचं धाडस तेव्हा ना शिवसेनेच्या नेत्यांनी केलं ना भाजपच्या. अपवाद फक्त भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे पाटील यांचा. त्यांनी मात्र त्या वेळी थेट नाव घेऊन विखे स्वकीयांची कशी वर्णी लावतात, हे नमूद केलं होतं. जिथं जाईल, तिथल्या पक्ष संघटनेचा स्वतः च्या कामापुरता वापर करून घ्यायचा आणि वेगवेगळ्या पदांवर निकटवर्तीयांची नावं लावायची, हे काँग्रेसवाल्याचं तंत्र आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी नेमकं ते ओळखलं आहे. त्यांना विखे यांचा अनुभव आहे. भाजपला खरं तर हा अनुभव आला आहे; परंतु त्यातून धडा घ्यायचं तो शिकत नाही. साधं कोपरगावचं उदाहरण घ्या. मूळच्या भाजपच्या असलेल्या विजय वहाडणे यांना आमदार स्नेहलता कोल्हे यांचा किती त्रास होतो, हे त्यांनाच माहीत. भाजपचा तालुकाध्यक्षही पूर्वीचा राष्ट्रवादीचाच. तालुकाध्यक्षपदालाही निष्ठावान मिळू नये, इतकी का भाजपची वाईट स्थिती झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपत आलेल्यांचा पाच वर्षांचा अनुभव पाहिला, तर ज्यांनी आयुष्यभर भाजपची विचारधारा जपली, त्यांना खितपत पडावं लागतं आहे, त्यांचा नव्यानं भाजपत आलेले मान, सन्मान ठेवत नाहीत. आयुष्यभर सतरंज्या उचलण्याचं काम करावं लागलं, आताही तेच करावं लागणार; परंतु विचारधारेतील माणसांसाठी ते करावं लागणं आणि एका रात्रीत विचारधारा बदलणार्‍यांसाठी ते करावं लागणं यात फरक आहे. विखे यांना आता भाजपतील निष्ठावंताचा जो विरोध होतो आहे, तो अशातून.
विखे यांच्या राजकारणाची एक पद्धत आहे. पैसा आणि स्वतः च्या कार्यकर्त्यांची फळी ते वापरतात. चिन्ह फक्त नावालाच वापरतात. त्यांना दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य कसं नाही, हे राष्ट्रवादी आणि भाजपतील कार्यकर्त्यांच्या टीकेतून स्पष्ट होतं. 

‘प्रिपेड सभा घेतल्या व विविध ठिकाणी पैशांच्या धुराबरोबरच मटणाच्या व दारूच्या पार्ट्याही केल्या’, ‘युवा पिढीला व्यसनाधीनतेकडे घेऊन जाण्याची प्रवृत्ती सुजय विखे यांची आहे’, ‘ते मेड इन चायना असून, हेलिकॉप्टर बॉय आहेत’, ‘राजकीय लाभासाठी भाजपमध्ये आले आहेत. त्यांची बांधिलकी केवळ सत्ता व पैशाशी आहे,’ अशा गंभीर आरोपांचा भडीमार खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर केला. हे तर राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे म्हणत होत्या. बरं सुजय असं करतात आणि त्यांचे वडील आणि आजोबा वेगळं काही करीत होते, असं म्हणावं, तर तसंही नाही. पैसा आणि सत्तेच्या जोरावर ते काहीही करायला तयार होतात, हे काँग्रेसवाल्यांसह विरोधकांनाही चांगलंच माहीत आहे. आता सुजय यांनी भाजपत प्रवेशाची राजकीय सर्जिकल यशस्वी केली असली, तरी त्यांच्यापुढं मोठी आव्हानं आहेत आणि ती त्यांच्या विरोधकांची नाहीत, तर स्वतःच्या राजकीय कोषाची किमंत त्यांना मोजावी लागेल. दिलीप गांधी यांच्याविषयी कितीही नाराजी असली आणि त्यांचा कारभार वादग्रस्त असला, तरी त्यांना अल्पसंख्याक समाजाचं पाठबळ आहे. जैन समाज त्यांच्या पाठिशी असतो. ठराविक लोक विरोधात असतात, नाही असं नाही; परंतु त्यांचं प्रमाण कमी आहे. नगर, जामखेड, पाथर्डी इथल्या जैन समाजाच्या मतदारांचं प्रमाण लक्षणीय असतं. हा समाज जरी भाजपच्या पाठिशी असला, तरी आपल्या समाजातील एखाद्यावर अन्याय झाला, तो त्या पक्षाला धडा शिकवायलाही कमी करीत नाही. खा. गांधी यांना डावलून जेव्हा प्रा. ना. स. फरांदे यांना उमेदवारी दिली होती, तेव्हा खा. गांधी शांत राहिले होते; परंतु खा. गांधी यांना डावलल्याची किमंत भाजपला चुकवावी लागली होती. एकवेळ खा. गांधी यांच्या सल्ल्यानं सुजय यांना भाजपत आणलं असतं, तर जैन समाजानं ते स्वीकारलंही असतं; परंतु टक्केवारी घेणारा खासदार अशी संभावना ज्या सुजय यांनी वारंवार केली, त्यांच्या आताच्या माफीनाम्यानं काय साधणार, हा प्रश्‍न आहेच. खा. गांधी समर्थकांनी सुजय यांच्या विषयी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या अशा त्राग्यातून हे लक्षात घ्यायला हवं. एकमेव जैन समाजाच्या असलेल्या दिलीप गांधी यांना उमेदवारी नाकारल्याचा फटका भाजपला देशभरात बसेल, असा इशारा गांधी समर्थकांनी दिला आहे. दिलीप गांधींवर अन्याय करणारा निर्णय पक्षानं घेतला असून, तो तातडीने बदलावा. पक्षाच्या निष्ठावान सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं रक्त सळसळायला लागलं आहे. कार्यकर्त्यांचा रक्तदाब (बीपी) वाढविणारा व झोप उडविणारा हा निर्णय असल्यानं गांधी यांनी आता शांत बसू नये, तातडीने योग्य निर्णय घ्यावा, लाखो कार्यकर्त्यांचे पाठबळ असल्यानं गांधीच विखेंचा पराभव करू शकतात, अशी जी भाषा वापरण्यात आली आहे, ती बंडाची आहे. खा. गांधी समर्थक त्यांना अन्य पक्षाचा मार्ग निवडण्याचा सल्ला देत आहेत. खा. गांधी यांनी यापूर्वी तसं कधी केलं नाही; परंतु आता तसं करणार नाहीत किंवा शांत राहतील, असं आताच काही सांगता येत नाही.


गेल्या दोन वर्षांपासून जो भारतीय जनता पक्षावर सातत्यानं आरोप करीत आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या घालत आहे अशांनाच पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊन पक्षानं आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. उत्तरेतील उपर्‍यांची आपण निष्ठावानांनी पालखी कशाला उचलायची? पक्षानं घेतलेला निर्णय निषेधाहर्र् आहे, असं सांगत युवा मोर्चाच्या 40 पदाधिकार्‍यांनी राजीनामा देण्याच्या दाखविलेली तयारी हा विखे यांच्यासाठी सूचक इशारा आहे. सत्ता व पदासाठी सुजय हट्टास पेटले आहेत. जो आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचा होऊ शकला नाही. तो भाजपचा कसा होईल?, असा निरुत्तर करणारा सवाल खा. गांधी समर्थकांनी विचारला आहे. बैठकीनंतर समर्थकांनी खा. गांधी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांनी सर्वांना शांत करून अजूनही वेळ गेलेली नसल्याचं स्पष्ट केलं. अर्थात त्याला आता काहीही अर्थ नाही. खा. गांधी यांनी कितीही प्रयत्न केले, तरी सुजय यांची उमेदवारी आता बदलता येणार नाही, हे त्यांनाही माहीत आहे. शिवसेनेचा राधाकृष्ण विखे यांच्या विरोधातला राग सुजय यांना चांगलाच माहिती आहे. स्थानिक राजकारणात काहीही झालं, तरी अनिल राठोड आणि विजय औटी हे मदत करतील, याची त्यांना खात्री आहे. त्याचं कारण पारनेरमध्ये विजय औटी यांना नंदकुमार झावरे गटाची मदत लागते. त्याशिवाय ते निवडून येऊ शकत नाहीत. असं असलं, तरी उद्धव ठाकरे यांचा शब्द अंतिम असतो. विखे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून भाजपवर टीका करण्याऐवजी सातत्यानं शिवसेनेलाच टार्गेट केलं होतं. त्यामुळं सुजय यांनी मातोश्रीचे उंबरठे झिजविले असले, तरी मुखपत्रातील संपादकीय पाहिलं, तर उद्धव यांचा विखे यांच्याविरोधातला राग कमी झालेला दिसत नाही. महाराष्ट्रातील घराणी ही काँग्रेसची होती. त्या घराण्यांच्या विरोधात आपला संघर्ष होता. ही घराणी म्हणजे विचारांचे ब्रह्म वाक्य नव्हे. वारा येईल तशी पाठ फिरवणारी ही घराणी असून भाजप किंवा शिवसेना ही काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचं ‘पाळणाघर’ होऊ नये, असं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे. उद्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, तेव्हा भूकंपाचा रिमोट शिवसेनेकडं असेल व ही घराणी शिवसेना भवनाच्या रांगेत असतील. त्यामुळं आपली माणसं आणि मूळ विचारच खरा. तात्पुरती सूज काय कामाची ?, असा प्रश्‍न उपस्थित करत शिवसेनेनं भाजपला चिमटा काढला आहे. विखे-पाटील घराण्याप्रमाणं मोठी राजकीय घराणी भाजपच्या गळाला लागतील. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नाराजांना घेऊनच हिंदुत्ववादी पक्षांना पुढं जायचं असेल तर ज्यांनी वर्षानुवर्षे विचारांचा भगवा झेंडा हाती घेतला त्यांनी काय करायचं?, असा प्रश्‍न शिवसेनेनं भाजपला विचारला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीतील इनकमिंग आज लाभदायक वाटलं असलं, तरी नंतर ते तापदायक ठरू शकतात, याचा अनुभव घेतला आहे. आज शिवसेनेवर टीका करणारे राधाकृष्ण विखे-पाटील कधीकाळी शिवसेनेत होते व पितापुत्रांना एकाच वेळी केंद्रात व महाराष्ट्रात मंत्रिपदं फक्त शिवसेनेनेच दिली होती; पण युतीची सत्ता जाताच त्यांनी पलटी मारली, याकडं शिवसेनेनं लक्ष वेधलं. संपादकीयातील ही भाषा सुजय यांना सूचक आहे, असं म्हणायचं का?