Breaking News

दखल भाग 9 - विखे मोठे, की पक्ष?
सुजय विखे यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतरची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भाषा पाहिली, तर ती आघाडीच्या धर्माला छेद देणारी आहे. शिवाय पक्षापेक्षा आपणच मोठे आहोत, आपल्याला कुणीच जाब विचारता कामा नये, अशी त्यांची धारणा दिसते. मुलगा ज्याचं ऐकत नाही, त्यांचं जनतेनं तरी का ऐकावं, असा प्रश्‍न कुणी विचारला, तर त्यानं विचलीत व्हायचं काहीच कारण नाही. इतरांकडं बोट दाखवून आपली चूक झाकता येत नसते.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे. युतीत दोन्ही पक्षांची जबाबदारी असते, ती परस्परांचे उमेदवार निवडून आणण्याची. काँग्रेसच्या नेत्यांनी जसे राष्ट्रवादीचा उमेदवार असलेल्या मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेणे आवश्यक असते, तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या पाहिजेत. आघाडीचा तो धर्म आहे. त्यातही विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्यांची जबाबदारी तर अधिक वाढते. अशा परिस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गुरूवारच्या वक्तव्यांकडं पाहावं लागेल. ते अजूनही काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचा मुलगा त्यांना न विचारताच भाजपत गेला, असं एकवेळ गृहीत धरलं, तर त्यांचे कार्यकर्तेही मग त्यांना न विचारताच भाजपत गेले का, असा प्रश्‍न पडतो. प्रवरानगर इथं जी बैठक झाली आणि त्यात जय श्रीरामच्या घोषणा झाल्या, त्या तरी राधाकृष्ण यांच्या साक्षीनंच झाल्या ना? तिथं त्यांनी अटकाव घातला नाही. आताही सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर काही वृत्तपत्रांत जी जाहिरात प्रसिद्ध झाली, त्यात भाजपचे चिन्हं, भाजपच्या नेत्यांचे फोटो असं असताना राधाकृष्ण विखे यांचाही फोटो प्रकाशित करण्यात आला आहे. राधाकृष्ण काँग्रेसमध्ये आहेत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, मग पक्षीय जाहिरातीत त्यांचा फोटो येतोच कसा? इतरांच्या पक्षनिष्ठा तपासायला निघालेल्यांनी स्वतः च्या दुहेरी निष्ठा तपासण्याची गरज आहे. बरं ज्या जाहिरातीत राधाकृष्ण यांचा फोटो छापून आला, त्याचा खुलासा करण्याची गरज त्यांना आणि काँग्रेसला वाटत नाही. मी असलो, तरच पक्ष आणि मी नसलो, तर पक्षाला कोण विचारतो, अशी विखे कुटुंबाची धारणा झाली आहे. यापूर्वी विखे यांनी अनेकदा काँग्रेस सोडली नंतर शिवसेनाही सोडली. त्या वेळी ते पक्ष संपले नाहीत. विखे यांनाच परत सोईनुसार पक्षाचा आधार घ्यावा लागला. आता काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करावी लागत आहे. याचा अर्थ विखे असले, म्हणजे या पक्षांना नवसंजीवनी आणि ते नसले, म्हणजे पक्ष संपले, असा कुणी अर्थ काढीत असेल, तर ते गैर आहे. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो. कितीतरी व्यक्ती इकडून तिकडून सरड्यासारख्या रंग बदलत फिरत असतात. सरड्यानं रंग बदलला म्हणजे निसर्ग जसा बदलत नाही, तसंच व्यक्तीनं पक्ष बदलला, म्हणजे पक्ष संपत नसतो. हे फक्त काँग्रेसलाच लागू आहे, असं नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा सर्वंच पक्षांना हे सूत्र लागू आहे. 

सुजय यांनी खासदार व्हावं, असं त्यांच्या मामांना वाटणं स्वाभावीक आहे. त्यासाठी त्यांनी मदतही केली पाहिजे; परंतु त्यांच्या भाजप प्रवेशाचं काँग्रेसमध्ये राहून समर्थन करणं कितपत योग्य आहे. काँग्रेस, शिवसेना पुन्हा काँग्रेस असा प्रवेश केलेल्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या निष्ठा तपासण्याचं काहीच कारण नाही. राधाकृष्ण आणि बाळासाहेब परस्परांवर टीका करण्याच्या योग्यतेचे तरी आहेत. त्यांच्या भांडणात पडलं, तर उगीचच आपल्यावरही शिंतोडे उडतील, एवढं तरी भान ठेवायला हवं. काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसच्याच नेत्यांवर टीका करण्यापेक्षा अगोदर हाती कमळ घेऊन मग थेट राहुल गांधी यांच्यावर टीका केली, तरी कुणीच काही म्हणणार नाही. राधाकृष्ण यांची काहीही झालं, तरी नगरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराला जाणार नाही, ही जी भाषा आहे, ती मुद्दामपणाची आहे. पवार यांनी बाळासाहेब यांच्यावर टीका केली, ती राधाकृष्ण यांना बोचणं स्वाभावीक आहे; परंतु बाळासाहेब ज्या कुत्सितपणे पवार यांच्यावर टीका करीत होते, त्याचं कसं समर्थन करता येईल? मरणानं वैर संपतं, असे दाखले आता राधाकृष्ण आणि त्यांचे समर्थक देत असले, तरी बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर तरी राधाकृष्ण यांनी वैर विसरण्यासाठी कुठं हात पुढं केला होता? त्यांचं पवार यांच्याविरोधातलं राजकारण दुसर्‍या पिढीतही चालूच होतं. त्यांना नगरची जागा काँग्रेससाठी निवडून आणायचीच होती, तर त्यांनी मुलाव्यतिरिक्त आमच्या पक्षाकडं एवढा सक्षम उमेदवार आहे, त्याच्यासाठी जागा सोडा, असा आग्रह धरायला हवा होता. तसा धरला नाही आणि आता मुलासाठी नाही, तर पक्षासाठी जागा सोडावी, असा आमचा आग्रह होता, असं सांगायला सुरुवात केली आहे. ही पश्‍चातबुद्धी झाली. पक्ष मोठा असेल, तर मग दक्षिणेतील एखाद्या नेत्याचं नाव का नाही पुढं केलं? घरातच उमेदवारी राहावी, असा हट्ट तरी का धरला? विखे पक्षाला मोठं मानत असतील, पक्षाचं हीत त्यांना महत्त्वाचं वाटत असेल, तर त्यांनी नगरमधील लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी माझी असं म्हणून यंत्रणेला कामाला लावायला हवं; परंतु काहीही झालं, तरी नगरमध्ये मी राष्ट्रवादीच्या प्रचाराला जाणार नाही, असं त्यांचं म्हणणं म्हणजे मुलाच्या विरोधात मी प्रचार करणार नाही, याच पठडीतलं आहे. नगर हा विखे यांचा जिल्हा. त्यांची या जिल्ह्यात ताकद. तिथंच ते प्रचाराला जाणार नसतील, तर त्यांना काय बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पाठवायचं का? ज्या विखे यांनी धृतराष्ट्रप्रेमापोटी नांदेड, परळी इथल्या सभांना दांडी मारली. दिल्लीच्या बैठकीला अनुपस्थित राहिले, त्यांनी मुलासाठी नाही, तर पक्षासाठी मतदारसंघ मागत होतो, असा दावा करावा, यासारखा दुसरा विनोद नाही. 

बाळासाहेब थोरात हे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य. त्यांनी जनतेच्या मनातील भावना व्यक्त करताना राधाकृष्ण यांनी पक्षनिष्ठा दाखवून द्यावी, असं म्हटलं, तर कुणाच्या नाकाला इतक्या मिरच्या लागायचं कारणच नाही. अशोक चव्हाण यांनी खरं तर प्रदेशाध्यक्ष या नात्यानं विखे यांना जाब विचारायला हवा होता; परंतु त्यांचा 40 वर्षांचा घरोबा त्यांना आड येत असेल. एखाद्या ज्येष्ठानं काही विचारलं, तर त्यावर त्यांना तसा अधिकारच नाही, असं म्हणून मोकळं होता येईलही; परंतु पक्षनिष्ठा दाखवून देण्याच्या आव्हानाचं काय हा प्रश्‍न उरतो.
चव्हाण आणि रोहमारे कुटुंबातलं सख्य सर्वांना माहीत आहे. के. बी. रोहमारे हे तर बाळासाहेब विखे यांना राजकारणात ज्येष्ठ. बाळासाहेब होते, तोपर्यंत विखे आणि रोहमारे यांच्या कुटुंबात चांगलंच सख्य होतं. बाळासाहेबानंतर त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांचा गट आता विखे कुटुंबापासून दुरावतो आहे. अशोक चव्हाण यांनी अ‍ॅड. अशोक रोहमारे यांच्यासाठी दिलेला कार्यक्रम डावलून राधाकृष्ण विखे यांनी चव्हाण यांना पळवलं, हा इतिहास फार जुना नाही. अ‍ॅड. अशोक रोहमारे यांना त्याचं शल्य अजून बोचतं आहे. सोईनुसार राजकारण करताना ज्यांनी आयुष्यभर साथ दिली, त्यांना दूर लोटलं जात असेल, तर इतरांनी त्यांच्यावर कसा विश्‍वास ठेवायचा? बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती. त्यांच्यांशी ते सातत्यानं संपर्कात असत. सुजय यांनी त्या फळीशी किती संपर्क ठेवला आहे, याचं उत्तर मिळत नाही. केवळ तरुणांच्या मतदानावर भिस्त ठेवून असाल आणि जुन्यांना कोण विचारतं, अशी भूमिका असेल, तर जुन्यांची वाघनखं परवडणारी नाहीत, याचं तरी भान ठेवलं पाहिजे.