Breaking News

मुलाच्या विरोधात प्रचार नाही; राधाकृष्ण विखे यांचे स्पष्टीकरण; विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय नंतर


मुंबई / प्रतिनिधीः
भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सुजयने माझ्याशी चर्चा करून घेतलेला नाही. तो त्याचा वैयक्तिक निर्णय होता. असे असले तरी त्याच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार मी करणार नाही,’ असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज स्पष्ट केले. तसेच, विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यायचा, की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून घेईन,’ असेही त्यांनी सांगितले. 

सुजय यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षांतर्गत विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज प्रथमच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. या वेळी त्यांनी मुलाच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयापासून हात झटकले. सुजय भाजपमध्ये जाण्यास राष्ट्रवादी काँग्रेसची आडमुठी भूमिका जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी अप्रत्यक्षरित्या केला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीने सुजयसाठी सोडावा, असा विखे यांचा आग्रह होता; मात्र राष्ट्रवादीने त्यास ठाम नकार दिला. उलट दुसर्‍यांच्या मुलांचे हट्ट आम्ही का पुरवू, असे पवार यांनी सुनावले होते. पवार यांच्या या वक्तव्याबद्दल व राष्ट्रवादीच्या एकूण भूमिकेबद्दल विखे यांनी संताप व्यक्त केला.
‘नगरच्या जागेबाबत दोन्ही पक्षांमध्ये अनेकदा चर्चा झाली होती. सतत पराभव झालेल्या जागांची अदलाबदल व्हावी असे आमचे म्हणणे होते. त्या निकषावरच आम्ही नगरची जागा मागितली होती; मात्र जिल्ह्यातील दोन्ही जागा काँग्रेसकडे देण्यास राष्ट्रवादीचा विरोध होता. खरे तर नाशिक, औरंगाबादमध्ये दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे एकाच पक्षाकडे जागा गेल्या असत्या, तर काही फरक पडणार नव्हता. उलट आघाडीचा एक खासदार वाढला असता,’ असे ते म्हणाले. 

नगर दक्षिणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे विखे यांनी या वेळी सांगितले. ‘आघाडीच्या धर्माला गालबोट लागेल असे वक्तव्य मी आजवर कधीच केलेले नाही; मात्र शरद पवारांनी मधल्या काळात विखे कुटुंबावर वैयक्तिक टीका-टिप्पणी केली. माझ्या हयात नसलेल्या वडिलांबद्दलही ते बोलले. त्यांच्या मनात आमच्या कुटुंबाबद्दल प्रचंड द्वेष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही,’ असे ते म्हणाले. सुजयचा प्रचारही करणार नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
 
सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. याबद्दल विचारले असता विखे संतापले. ते म्हणाले, “थोरात स्वत:ला हायकमांडपेक्षा मोठे समजतात का? ते माझे हायकमांड नाहीत. मला त्यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. जे सांगायचे, ते मी पक्षाच्या नेत्यांकडे सांगेन आणि वेळ आल्यानंतर थोरातांच्या पक्षनिष्ठेबद्दलही बोलेन.’’

बाळासाहेबांचा पराभव करण्याचा
आदेश राजीव गांधींचाः आव्हाड
विखे पाटील-पवार वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गौप्यस्फोट केला आहे. “बाळासाहेब विखे- पाटील यांचा पराभव करायला राजीव गांधी यांनी सांगितले होते. केवळ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून शरद पवार यांनी ती जबाबदारी पार पाडली,’’ असे सांगून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, ‘पक्ष निष्ठा शिकवू नये. भाजपसोबत हातमिळवणी करणार्‍यांनी आघाडी धर्म शिकवू नये,’, असा टोला या वेळी आव्हाड यांनी विखे-पाटलांना लगावला. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर देखील नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता आव्हाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.