Breaking News

विठ्ठल सेवा समजणार्‍या पुंडलिकाची समाजाला गरज-तनपुरे


वरुर/प्रतिनिधी
पुंडलिक महाराजांच्या जीवनातून संदेश घेऊन आपण आई-वडिलांच्या सेवेला जर ईश्‍वर सेवा समजले तर या जगात वृद्धाश्रमच राहणार नाहीत. असे राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे श्री क्षेत्र वरुर (धाकटी पंढरी) म्हणून तालुक्यात प्रसिद्ध असणार्‍या पुण्यक्षेत्रात भक्त पुंडलिक मूर्ती स्थापना व कलशारोहण समारंभात म्हणाले. यावेळी नंदिनी चांदणी आणि वटफळी नदीच्या त्रिवेणी संगमावर भक्त पुंडलिकाचे भव्य मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. भक्त पुंडलिक रायांच्या मूर्तीची स्थापना राष्ट्रीय संत ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे श्रीक्षेत्र पंढरपूर यांच्या हस्ते करण्यात आली.

ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री, ह.भ.प.कृष्णदेव महाराज काळे, ह.भ.प.राम महाराज झिंजूर्के, ह.भ.प.दिनकर महाराज अंचवले यांच्या शुभहस्ते कलश पूजा व कलशारोहण करण्यात आले. ह.भ.प.प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपरोक्त समारंभ पार पडला.
यावेळी बोलताना राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे म्हणाले की, पुंडलिक महाराजांच्या जीवनातून संदेश घेऊन आपण आई-वडिलांच्या सेवेला जर ईश्‍वर सेवा समजले तर या जगात वृद्धाश्रमच राहणार नाहीत. पुंडलिकाचे चरित्र डोळ्यासमोर ठेवून सदाचरण केल्यास सक्षम व संस्कारक्षम कुटुंबव्यवस्था निर्माण होईल. गावातील सर्व ग्रामस्थांच्या बहुमोल योगदानाचे सर्व संतमंडळींनी भरभरून कौतुक केले. यावेळी श्री क्षेत्र वरुर ग्रामस्थांच्यावतीने वैराग्यमूर्ती ह.भ.प.सत्यविजय महाराज कोरडगावकर यांना पंढरीचा वारकरी हा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. (संप्रदायिक नित्य सेवेबद्दल) यावेळी गावातील ज्येष्ठ वारकरी तुकाराम बुवा झिरपे, भिकाजी बर्डे, यांचा परमार्थ सेवे प्रित्यर्थं पुंडलिक महाराज मंदिर देवस्थान समितीच्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी वरुर भूषण दिनकर महाराज अंचवले, लक्ष्मण महाराज भवार, समाधान महाराज जाधव, राम महाराज उदागे, गणेश महाराज डोंगरे, ज्ञानेश्‍वरचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, माजी सभापती संजय कोळगे, कृष्णा पायघन, प्राचार्य दिलीपराव फलके आदींसह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.