Breaking News

राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाने चेन्नईचे कॉलेज आले अडचणीत


चेन्नईः काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी (दि.13 मार्च) तमीळनाडू दौर्‍यावर असताना चेन्नईतील स्टेला मारिस महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. या वेळी विद्यार्थ्यांनी राहुल यांना अनेक प्रश्‍न विचारले होते. त्यावर राहुल यांनी देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे दिली होती; मात्र या कार्यक्रमामुळे आता महाविद्यालयीन प्रशासनाची पंचाईत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू असताना महाविद्यालय शिक्षण संचालनालयाने राजकीय कार्यक्रमाला परवानगी कशी दिली, अशी विचारणा विभागीय संयुक्त संचालकांना केली आहे.

या वेळी जीन्स आणि टी शर्टमध्ये असलेले राहुल गांधी विद्यार्थ्यांमध्ये सहभागी झाले होते. या वेळी विद्यार्थी आणि राहुल यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी एक विद्यार्थिनीने राहुल यांना प्रश्‍न विचारत असताना ‘सर’ असा उल्लेख केला असता, राहुल यांनी ‘कॉल मी राहुल’ असे म्हटले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकला. हा व्हिडिओ सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी महाविद्यालय शिक्षण संचालनालयाने विभागीय सयुक्त संचालकांना देशात आचारसंहिता लागू असताना राजकीय पक्षाच्या नेत्याच्या चर्चेसाठीच्या कार्यक्रमासाठी कॉलेजच्या कॅम्पसचा वापर करायला परवानगी कशी दिली, असा प्रश्‍न विचारला आहे. त्यामळे प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे.