Breaking News

आगामी निवडणुका ’ईव्हीएम’च्याच माध्यमातून


नवी दिल्ली - एकीकडे आगामी लोकसभेला फारच कमी कालावधी उरलेला आहे. तर, दुसरीकडे ईव्हीएमच्या वैधतेवर देशभरात संभ्रमाचे वातावरण आहे, असे असतानाही निवडणुका या ईव्हीएमच्या माध्यमातूनच होतील, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिले. ते नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये होणार्‍या निवडणुकांवरही मत व्यक्त केले.

देश 17 व्या लोकसभा स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार्‍या ईव्हीएम बद्दल सामान्य मतदाराच्या मनात अनेक संभ्रम आहेत. अशातच मागच्या महिन्यात अमेरिकेमध्ये सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीने ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड करता येऊ शकतो, असे जाहीर पत्रकार परिषदेतून सांगितले होते. त्यामुळे ईव्हीएम बद्दल भ्रम अधिकच बडावला आहे. मात्र, या निवडणुका ईव्हीएमच्या माध्यमातूनच होतील, असे अरोरा यांचे म्हणणे आहे. मागच्या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकानंतर ईव्हीएमचा अनेक निवडणुकांमध्ये उपयोग झाला. दिल्ली, कर्नाटक आणि नुकतेच 4 राज्यांमधील निवडणुका या यशस्वीपणे पार पडल्या. या निवडणुकांमध्ये वेग-वेगळे पक्ष विजयी झाले. तसेच त्यांना पडलेल्या मतांमध्ये मोठा फरक होता. यावरून ईव्हीएमच्या वैधतेवर आक्षेप घेता येणार नाही, असे अरोरा म्हणाले. आगामी निवडणुका या ईव्हीएमच्या माध्यमातून होतील. यामध्ये शंकाच नाही, असे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले.