Breaking News

पोलिस निरिक्षक अनिलकुमार जाधव आणि त्यांच्या पत्नीचे अपघाती निधन


श्रीगोंदे/प्रतिनिधी : पुण्यात राहणार्‍या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेले धारूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार जाधव आणि त्यांच्या पत्नी सुजाता (वय 40) यांचा नगर-पुणे रोडवर झालेल्या कारच्या अपघातात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. 

अनिलकुमार जाधव हे सध्या धारूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांची ऐश्‍वर्या नावाची मुलगी पुण्यात युपीएससीची तयारी करीत आहे. तसेच त्या एका शाळेवर शिक्षिकाही आहेत. ऐश्‍वर्याचा आज वाढदिवस होता. तिला शुभेच्छा देण्यासाठी जाधव हे पत्नी सुजाता यांच्यासह कारने (एमएच 10- 8889) पुण्याला जात होते. नगर-पुणे महामार्गावर बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीत गव्हाणेवाडी जवळ त्यांच्या कारला अपघात झाला. उभा असलेल्या कंटेनरला कार धडकून रस्त्याच्या खाली गेल्याने हा अपघात झाल्याचे शिरूर पोलिसांकडून सांगण्यात आले. 

जाधव हे स्वता: कार चालवित होते. तर पत्नी या बाजूला बसलेल्या होत्या. कार डाव्या बाजुला पलटल्याने त्यामध्ये अडकल्या. हा अपघात झाल्याची माहिती समजताच बाजूच्या लोकांनी धाव घेत दोघांनाही जवळच्या रूग्णालयात दाखल केले. उपचारासाठी नेत असतानाच सुजाता जाधव यांची प्राणज्योत मालवली. तर अनिलकुमार जाधव यांच्यावर पुण्यातील खराडी येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचे निधन झाले. ऐश्‍वर्या जाधव हिच्या खबरीवरून शिरूर पोलिस स्टेशनला पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. शिरूर पोलिसांनी हा गुन्हा बेलवंडी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला असून पुढील तपास पोलिस हवालदार रावसाहेब शिंदे करत आहेत.