Breaking News

शिर्डीमधून तीन विद्यार्थ्यांचे अपहरण


शिर्डी/प्रतिनिधी: येथील आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याचा प्रकार घडला आहे. हे तीनही विद्यार्थी इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होते. याप्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संकेत राजेंद्र वीर (वय-१३, रा. संभाजीनगर), साई भारत बाविस्कर(वय -१३, रा. गणेशवाडी) आणि सोनू नवनाथ कुलथे (वय-१५, रा. विरभद्र कॉलनी) या तिघांचे अपहरण झाले आहे. हे तिघे मित्र असून आदर्श विद्यालयामध्ये नववीत शिकतात. काल(गुरुवारी) सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे तिघेही शाळेत गेले होते. मात्र सायंकाळी ते घरी परतले नाहीत. पालकांनी शोध घेतला असता ते कोठेही आढळले नाहीत. दरम्यान याप्रकरणी राजेंद्र भागवत वीर यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.