Breaking News

खडसेंना हायकोर्टाचा दणका दमानियाविरोधातील बदनामी याचिकांना स्थगिती


मुंबई / प्रतिनिधीः
भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. खडसे समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात राज्यभरात दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुक्ताईनगर, रावेर, यावळ आणि शिरपूरमध्ये सुरू असलेल्या खटल्यांना उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे स्थगिती मिळाली आहे. 32 पैकी 21 खटल्यांना बुधवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर दमानिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. राज्यभरात जळगाव, नाशिक, धुळे, बुलडाणा, जालना आणि नंदूरबार अशा सहा जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण 32 अब्रूनुकसानीचे खटले दमानिया यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. यातील उर्वरित 11 प्रकरणांविरोधात स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे निर्देहशी उच्च न्यायालयाने या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांना दिले आहेत. दमानिया यांनी खडसे यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रारी आणि याचिका दाखल केल्या होत्या. ज्यामुळे सध्या खडसे यांच्यासारख्या बड्या नेत्याला राजकीय वनवास भोगावा लागत आहे.