Breaking News

बालवैज्ञानिक स्पर्धेत ध्रुव ग्लोबलच्या श्रेयानला सुवर्ण


संगमनेर/प्रतिनिधी: मुंबईच्या विज्ञान अध्यापक मंडळाच्यावतीने घेतल्या जाणार्‍या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक राज्यस्तरीय स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या श्रेयान अनिकेत कासारने सुवर्ण पदक पटकाविले आहे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा परिपोष व्हावा आणि विज्ञानातील महत्वाच्या घडामोडींचे आकलन व्हावे यासाठी इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येते.

गेल्या ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत श्रेयान कासार याला उत्तम गुणांच्या आधारे विभागीय स्पर्धेत स्थान मिळाले होते. येथेही त्याने नव्वद टक्के गुण मिळविल्याने त्याची मुलाखत व कृतिसंशोधनासाठी निवड करण्यात आली. श्रेयानने परिसराच्या विकासासाठी ‘परिसर सेना’ या विषयावर कृतिसंशोधन सादर केले.

त्याचा संशोधन प्रकल्प आणि मुलाखतीतील उत्तम गुणांच्या आधारावर त्याला रोख रुपये तिन हजार, सुवर्णपदक व गौरवपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. त्याच्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबलचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.