Breaking News

शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात शंभूराजांना डावलले


पाटण / प्रतिनिधी : लोकनेते बाळासाहेब देसाई जयंती, अंगणवाडी व शिक्षक पुरस्कार कार्यक्रमांच्या पत्रिकांमध्ये पाटण तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे नाव न टाकल्याने त्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप सुरेश पानस्कर यांनी करून एकतर्फी कार्यक्रमामुळे देसाई गटाच्या सदस्यांनी निषेध व्यक्त करत सभात्याग केला. यावर पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. आम्ही कोणाला बोलवायचं हा आमचा नैतिक अधिकार आहे. टंचाईसारख्या गंभीर विषयावर चर्चा न करताच विरोधक निघून गेले देव त्यांना सुद्बुध्दी देवो, अशा शब्दात उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.

पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती सौ. उज्वला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी मिनाक्षी साळुंखे, उपसभापती राजाभाऊ शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पाटण पंचायत समितीत नव्याने रुजु झालेल्या गटविकास अधिकारी मिनाक्षी साळुंखे यांचे स्वागत करण्यात आले.

मोरगिरी प्रादेशिक योजनेचे वीजबील माफ करावे, अशी मागणी करून टंचाई काळात वीज कनेक्शन तोडू नये अशा सूचना उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी अधिकार्‍यांना केल्या. पल्स पोलिओ मोहिमेचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून तालुक्यात पुरूषांमागे 927 इतका स्त्री जन्मदर आहे. 4 ठिकाणचे नमुने दुषित आढळले असून संबंधितांना सूचना केल्याचे डॉ. दीपक साळुंखे यांनी सांगितले. वनवे लावणार्‍यांवर वनविभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सदस्य बबन कांबळे यांनी केली. ग्रामपंचायतीच्या वसुलीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र वसुलीबाबत लोकांनी ग्रामपंचायतींना सहकार्य करावे अशी विनंती ग्रामपंचायतीचे टिपीओ कुंभार यांनी केली. पाटण ते कोयना सुरू असलेले रस्ता रूंदीकरणाचे काम मंद गतीने सुरू असून सर्वांनाच त्याचा त्रास होत आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे, अशी मागणी बबनराव कांबळे यांनी सभागृहात केली.

यावेळी बांधकाम, शेती, पशू संवर्धन विभागाचा आढावा देण्यात आला. सभापती सौ. उज्वला जाधव यांनी स्वागत केले. उपसभापती आमदार लोकनेत्यांपेक्षा मोठे नाहीत पंचायत समितीच्या कामात राजकारण येवू नये यासाठी आम्ही आजपर्यंत कटाक्षाने पाहिले. लोकनेत्यांविषयी आमच्या मनात आदर आहे. लोकनेत्यांच्या जयंती कार्यक्रमाला विरोधकांनी आले पाहिजे होते. जर खरोखरच त्यांना लोकनेत्यांबद्दल आदर व प्रेम असते तर ते जयंतीच्या कार्यक्रमाला आले असते. आमदार हे लोकनेत्यांपेक्षा मोठे नाहीत, असे विधान उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी बैठकीच्या शेवटी बोलताना केले.
राजाभाऊ शेलार यांनी आभार मानले.