Breaking News

कराडमध्ये रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न


कराड / प्रतिनिधी : चिखली (ता. कराड) येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असणार्‍या सामाजिक सभागृहाला देण्यात आलेले शामराव आबाजी चव्हाण यांचे नाव हटवावे, या मागणीसाठी गुरुवारी पंचायत समितीत गटविकास अधिकार्‍यांच्या केबिनमध्ये ग्रामपंचायत सदस्य, तक्रारदार व अन्य दोघांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार महेश धर्मेंद्र पाटील यांनी वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेच्या चिखली शाळेच्या आवारात असणार्‍या सामाजिक सभागृहाला देण्यात आलेले शामराव आबाजी चव्हाण हे नाव काढून टाकण्यात यावे, अशी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सदस्य बंडोराव ज्ञानदेव सावंत यांच्यासह काहींनी या नावाला विरोध दर्शवला आहे. तर ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांनी हे नाव काढले जाणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

या दोन्ही गटाच्या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी असे नाव देणे हे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याने ते काढून टाकण्यात यावे, असे पत्र चिखलीच्या ग्रामसेवकास दिले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे तक्रारदार महेश पाटील यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

गुरुवारी गटविकास अधिकार्‍यांनी दोन्ही गटातील सदस्य व तक्रारदार यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत निर्णय न झाल्यामुळे नाराज झालेले तक्रारदार महेश पाटील, सदस्य बंडोराव सावंत, विजय सदाशिव जगताप, बापूराव रामदास जाधव यांनी कार्यालयातच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कर्मचार्‍यांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना परावृत्त केल्याने अनर्थ टळला. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेउन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.