Breaking News

जिल्ह्यातील राजकीय दहशतवाद संपवणार


सातारा / प्रतिनिधी : शेजारच्या पुणे तसेच कोल्हापूर जिल्ह्यांचा विकास झाला असताना सातारा जिल्हा मात्र अद्याप मागास राहिला आहे. औद्योगिक वसाहतींची वाताहत सुरु आहे. शेतकरी, कामगार, धरणग्रस्त तसेच व्यावसायिक यांची उन्नती साधण्याबररोबरच जिल्ह्यातील राजकीय दहशत मोडीत काढण्यासाठीच युतीकडून लोकसभा निवडणूक लढवत असल्याचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, पुरुषोत्तम जाधव, शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, नगरसेवक विजय काटवटे आदी मान्यवर उपस्थित होते. नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे यांनी राज्यात भाजप-शिवसेना तसेच मित्रपक्षांची महायुती केली आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी लोकसभेची निवडणूक लढवत आहे. विद्यमान खासदारांनी जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे जिल्हात अजिबात विकास झाला नाही. सातारा औद्योगिक वसाहतीची वाताहत झाली आहे. दहशत, हप्तेगिरीमुळे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहे. युवकांना रोजगार नाहीत. शिक्षणासाठी सुध्दा पुणे-मुुंबईकडे धाव घ्यावी लागत आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. शेतकर्‍यांची अवस्था चांगली नाही. या सर्वांबरोबरच आतापर्यंत दुर्लक्षित झालेल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचविण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. जिल्ह्यात राजकीय दहशतवाद असल्याने प्रगतीला खीळ बसली आहे. राजकीय दहशतवाद मोडून काढण्याचा आमचा प्रयत्न राहीली. स्व. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्यामाध्यमातून जिल्ह्यात अनेक दौरे करुन माहिती घेतली. औद्योगिक वसाहतीमध्ये काय चालतं ते सर्वांनाच माहित आहे. हे प्रकार आम्ही थांबवणार आहोत, असे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई व माझेमध्ये कधीही वाद नव्हते. ते या निवडणुकीत युतीचेच काम करणार आहेत. माजी आमदार मदनदादा हे नियोजित कामामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मित्रपक्षांना सोबत घेवून या निवडणुकीत मी नक्कीच विजयीश्री खेचून आणू, असे पाटील यांनी सांगितले.
नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ही लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील विषय महत्वाचे ठरणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान कशी उंचावेल हे पाहणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे. या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील वैयक्तिक विषयांना प्राधान्य देण्याचे काम नाही. विक्रम पावस्कर यांनीही एकत्रित नेटाने काम करुन नरेंद्र पाटील यांना विजयी करणार असल्याचे सांगितले. आ. शंभूराज देसाई यांनीही पाटण तालुक्यातून पाटील यांना जास्तीतजास्त मते मिळतील, असे खात्रीशीर सांगितले. 

लोकसभेसाठी इच्छुक होतो. परंतु, आता नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या हातात शिवबंधन बांधले आहे. ते माझे धाकटे बंधू आहेत. काहीही झाले तरी जिल्ह्यात भगवा फडकला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी काय आणि नरेंद्रदादा काय? शेवटी जिल्ह्यात धनुष्यबाणच चालणार आहे. त्यामुळे मी समाधानी असून नरेंद्रदादांचे काम पूर्ण ताकदीने करणार आहे.
- पुरुषोत्तम जाधव