Breaking News

बॉम्ब शोधक पथकाकडून शहरातील गर्दीच्या स्थळाची तपासणी


अमरावती: अतिसतर्कतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक- नाशक पथकाकडून आज सकाळी शहरातील गर्दीच्या स्थळाचीबारकाईने तपासणी करण्यात आली.सार्वत्रिक आणि गर्दीच्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले होण्याचे संकेत गुप्तचर यंत्रणेने दिले आहेत. त्यानुसार येथील बॉम्ब शोधक-नाशक पथकाने गर्दीच्या ठिकाणाची सूक्ष्म तपासणी आरंभली आहे. अमरावती शहरातील डी-मार्ट, राजकमल चौक, बसस्थानक व जलशुद्धीकरण केंद्रांची विविधयंत्रणांमार्फत तपासणी करण्यात आली

दरम्यान, बेवारस वस्तू, साहित्य निदर्शनास येताच या पथकाकडून त्यांचीदेखील तपासणी करण्यात आली. मंदिर, मशीद, रेल्वे स्थानक, प्रमुख महत्त्वाची स्थळे, मध्यवर्ती कारागृह आदी जागांची बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून तपासणी केली जात आहे. राज्याच्या गुप्तचर यंत्रणेने सतर्कता बाळगण्याचे निर्देश सुरक्षायंत्रणेला दिले आहेत.

बॉम्ब पेरून घातपाती कारावाया करण्याचे मनसुबे दहशतवादी संघटनांचे आहे. त्यामुळे बेवारस साहित्य किंवा वस्तू निदर्शनास आल्यास त्याला हात लावू नये. त्याठिकाणी नागरिकांनी गर्दी न करता पोलीस यंत्रणेला ही माहिती द्यावी. कुणी संशयास्पद अथवा अनोळखी दिसून आल्यास, त्याबाबत पोलीस प्रशासनाला कळवावे, असे आव्हाहन पोलीस आयुक्त संजय बावीस्कर यांनी केले आहे तर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पाकिस्तानी कैदी आहे. यापार्श्वभूमीवर कारागृहाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. मोहम्मद जावेद असे या पाकिस्तानी नागरिक असलेल्या कैद्याचे नाव आहे.भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांत निर्माण झालेल्या दुराव्यामुळे या पाकिस्तानी कैद्याला सध्या अंडा बराकीत सुरक्षित ठेवण्यात आले आहे.