Breaking News

खासगी सावकारांवर दंडुका कधी?


पाचगणी / प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपूर्वी महाबळेश्र्वर तालुक्यात खासगी सावकारीला कंटाळून एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच महाबळेश्र्वर तालुका समन्वय समितीच्या सदस्या वर्षा उंबरकर यांच्यावरही वाई येथील व्यापार्याकडे व्याजाच्या पैशाची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे महाबळेश्र्वरातही खासगी सावकारीने डोके वर काढले असून यावर वेळीच अंकुश लावणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असून नूतन एसपी तेजस्वी सातपुते या सावकारांवर कारवाईचा दंडुका कधी उगारणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

‘गरजवंताला अक्कल नसते अन्‌ सावकाराला भिड नसते’, या म्हणीप्रमाणे महाबळेश्र्वर तालुक्यात सावकारांनी डोके वर काढले आहे. जिल्ह्याच्या इतर भागात खासगी सावकारीने हजारो संसार उद्ध्वस्त झाले असताना पर्यटनाच्या नंदनवनात बड्या धेंडांकडून गोरगरिबांना लुटले जात आहे. आत्महत्येचा प्रयत्न व नुकताच दाखल झालेला गुन्हा हे याचेच द्योतक आहे. त्यामुळे महाबळेश्र्वरलाही आता सावकारीची कीड लागली आहे. यामध्ये तालुका समन्वय समितीच्या सदस्यावरच गुन्हा दाखल झाल्याने महाबळेश्र्वरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

महाबळेश्र्वर हे एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी दरवर्षी सुमारे 10 लाखाहून अधिक पर्यटक भेट देतात. स्थानिकांचे पोट या पर्यटनावरच अवलंबून आहे. वर्षभर पर्यटन असल्याने हा तालुका काही प्रमाणात सधन मानला जातो. मात्र, ग्रामीण भागात परिस्थिती बिकट आहे. अशी हलाखीची परिस्थिती असणार्यांनाच सावकार टार्गेट करून त्यांना पैसे देत आहे. यापोटी अव्वाच्यासव्वा व्याजाची आकारणी केली जात आहे. नुतन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चार्ज घेऊन महिन्याचाही कालावधी लोटला नाही. तोपर्यंत त्यांनी मोक्कांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे त्यांची एंट्री दमदार झाली आहे. त्यांच्याकडून महाबळेश्र्वरवासियांना मोठ्या अपेक्षा असून तालुक्यातील सावकारीला वेसण घालण्याची गरज आहे. समाजामध्ये पांढरपेशी वेशात खासगी सावकारांचा बागुलबुवा दिवसेंदिवस वाढत आहे.

महाबळेश्र्वर तालुक्याला सातारा जिल्ह्यातील खाजगी सावकारांनी लक्ष केले आहे. महाबळेश्र्वरमधील मुख्य चौकात खाजगी सावकारीतून पैसा दिला जात आहे. वसुलीकरता पांढर्या बगळ्यांकडून महिलांचा वापर होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात वाढलेली खाजगी सावकारी मोडीत काढण्यासाठी एसपींना मोहिम काढावी लागणार आहे. यामध्ये येणारे पॉलिटिकल प्रेशर त्या कशा मॅनेज करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.