Breaking News

प्रिया जामकरांच्या ‘सावित्री’स सातारकरांची दादमराठी भाषा पंधरवड्यांतर्गत मसापच्या शाहुपूरी शाखेतर्फे आयोजन
सातारा/ प्रतिनिधी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहुपुरी शाखेतर्फे मराठी भाषा पंधरवड्यांतर्गत नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री’ या पत्रात्मक कांदबरीवर आधारित ‘सावित्री’ हा एकपात्री नाटयाविष्कार अभिनेत्री प्रिया जामकर यांनी सादर केला. जवळपास दीड तास त्यांनी केलेल्या या सादरीकरणामुळे सातारकर मंत्रमुग्ध झाले. ‘सावित्री’ ही पत्ररूप कादंबरी. अवघी 49 पत्रं असलेली. आकार छोटा, पण अवकाश मोठा अशी. आईविना वाढलेल्या, तरुण बुद्धिमान मुलीच्या विचारविश्र्वाचा, भावभावनांचा पस मांडणारी. सुरुवातीला मुग्ध आणि नंतर परिपक्व होत जाणार्‍या तिच्या प्रेमाचा प्रवास सांगणारी ही कादंबरी. पण तरीही ती केवळ प्रेमकथा नाही. साऊला अशा कुठल्या चौकटीत बसवताच येत नाही. कारण या बुद्धिमान, स्वतंत्र विचारांच्या, आपल्या स्वातंत्र्याचे मोल जाणणार्‍या, पण त्यातून येऊ शकणारा बंडखोरपणा, बेबंदपणाचा लवलेशही नसणार्‍या, अत्यंत संवेदनशील, कलासक्त, काळाच्या कितीतरी पुढे असलेल्या, वसुंधरैव कुटुम्बकम्‌ वृत्तीच्या आणि प्रेम या संकल्पनेला कितीतरी व्यापक रूपात पाहणार्‍या अशा मुलीच्या जगण्याचा पटच विलक्षण आहे. तिच्याच वडिलांच्या शब्दात सांगायचं तर ती आनंदभाविनी आहे. आपल्याला मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचं, आपल्याला जे जे हवं ते आपणच व्हायचं ही तादात्म्यता तिच्यात आहे, पण असं एकरूप होतानाही आपलं मीपण हरवू न देण्याचं भानही तिच्याकडे आहे. आनंदी, खेळकर, विचारी, तीक्ष्ण विनोदबुद्धी असलेली, विचक्षण, धीट, उत्कट अशी ही तरुण मुलगी आहे. एका प्रवासात भेटलेल्या तरुण, बुद्धिमान सुहृदाशी तिचा स्वत:हून संवाद सुरू झाला आहे. म्हणजे कोणत्या तरी ऊर्मीतून तिनेच पुढाकार घेऊन त्याला पत्रं लिहिलं आहे. त्याचंही तेवढयाच तत्परतेने उत्तर आलं आहे आणि दोन्ही बाजूंनी संवादाची तितकीच असोशी आहे, हे दोघांनाही मनोमन उमजलं आहे. पण ही सगळी पत्रं सावित्रीने लिहिलेली आहेत. त्यामुळे तिच्या त्याला उत्तर देणार्‍या प्रत्येक पत्रातून त्याने त्याच्या पत्रात काय लिहिलं असेल याचा वाचक फक्त अंदाज करू शकतो. त्यामुळे तिची उत्कटता कळते तशी त्याची कळत नाही. पण सावित्रीचं मन त्याला जाणवलंय आणि त्यालाही अशाच बुद्धिमान संवादाची ओढ आहे, हे तिच्या प्रतिसादात्मक पत्रांमधून जाणवतं राहतं. ‘सावित्री’ सादर करणार्‍या अभिनेत्री प्रिया जामकर या पुण्याच्या एसएनडीटी महाविद्यालयात मराठीच्या विभागप्रमुख आहेत. अत्यंत बोलके डोळे, लवचिक आवाज, नृत्याची जाण असल्यामुळे लयबद्ध हालचाली, कवयित्री असल्यामुळे ‘सावित्री’मधली तरलता समजून घेण्याची क्षमता आणि अभिनयाची मुळातच असलेली आवड या सगळ्या गोष्टी त्यांना ‘सावित्री’ उत्तमरित्या साकारली. मुळात हा सगळा एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीशी साधलेला संवाद. तो निव्वळ नाट्यवाचन या स्वरूपात न करता एकपात्री प्रयोग या स्वरूपात सादर केला त्यामुळेच प्रयोग संपल्यानंतर दहा मिनिटे टाळयांचा कडकडाट होत राहिला. प्रास्ताविक किशोर बेडकिहाळ, सूत्रसंचालन ऍड. चंद्रकांत बेबले यांनी तर आभार अजित साळुंखे यांनी मानले. मराठी भाषा पंधरवडयांचा समारोप रविवार, 17 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता नगरवाचनालयाच्या पाठक ह़ॉलमध्ये होणार आहे.