Breaking News

निवडणूकीतले मतभेद विसरून प्रगती साध्य करावी : क्षीरसागर


कोरेगाव, (प्रतिनिधी): निवडणुकीतील चुरस मतभेद आणि संघर्ष सर्वांनी विसरावेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर कोणाचा कोणता गट आहे हे विसरून सर्व नूतन सदस्य सरपंच उपसरपंच यांनी एकत्र येऊन गावाची प्रगती साधावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील अंभेरी येथे नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. त्याच्या निकालानंतर नूतन सरपंच आणि सदस्य यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करताना ते बोलत होते. डॉ. क्षीरसागर म्हणाले, लोकशाही हे एक मंदिर असून जनता ही त्यातील देवता आहे, आणि निवडणूक हा लोकशाहीचा पवित्र उत्सव आहे. आजच्या काळात गुन्हेगारी बेरोजगारी पाणीटंचाई अशा अनेक आव्हानांना ग्रामपातळीवर तोंड द्यावे लागत आहे. ते यशस्वीपणे देण्यासाठी मतभेद विसरणे गरजेचे आहे. आदर्श गाव योजना पाणी फाउंडेशन शासनाच्या विविध योजनांचा फायदा पूर्णांशाने करून घेण्यासाठी नूतन कार्यकारिणीने एकत्र एक दिलाने काम करावे. यावेळी नूतन सरपंच विष्णू गायकवाड तसेच सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.