Breaking News

शांतता समितीच्या बैठकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे कारवाईचा बडगा थांबवा! आ. हर्षवर्धन सपकाळ


 बुलडाणा,(प्रतिनिधी): डोंगर खंडाळा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर नायब तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी 42 जणांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी आश्‍चर्य व्यक्त करीतच सदर प्रकरणी त्रयस्था मार्फत निष्पक्ष चौकशी करून जिल्हा पोलीस प्रशासनाने शांतता समितीच्या सभेत दिलेल्या शब्दाप्रमाणेच भूमिका घ्यावी व ग्रामस्थांविरुद्ध नाहक कारवाईचा बडगा उगारणे थांबवावे, अशी मागणी आज आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे प्रत्यक्ष भेटीत केली आहे. 

डोंगर खंडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्या वरून प्रशासन विरुद्ध ग्रामस्थ असा वाद विकोपाला गेला होता. त्यादिवशी उद्भवलेल्या दंगल सदृश्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सुवर्णमध्य काढावा , तसेच प्रस्तुत प्रकरणी पोलिसांनी नागरिकांविरुद्ध सरसकटपणे कोणतीही कार्यवाही करू नये, अशी भूमिका घेतली होती. तसेच अज्ञात व्यक्तीवरच आवश्यक असल्यास गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली होती. 

त्यांच्या या मागणीला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने दुजोरा देत सुवर्णमध्या चा मुद्दा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले होते. त्याचप्रमाणे नागरिकांवर कारवाई केल्या जाणार नाही अशी ग्वाही सुद्धा दिली होती. तथापि प्रस्तुत प्रकरणी डोंगर खंडाळा येथील बेचाळीस जणांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही केल्या गेलेली आहे . या अनुषंगाने भेट घेत आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी गुन्हे दाखल झालेल्या कार्यवाहीबद्दल आश्‍चर्य व्यक्त करीत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शांतता सभेत दिलेल्या शब्दाप्रमाणे भूमिका घेऊन कारवाईचा बडगा उभारू नये व 42 च्या पुढे ही संख्या जाणार नाही , तसेच ज्या 42 व्यक्तींविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला त्याची पडताळणी करून फेर चौकशी करण्याची मागणी केली आहे. सदर तपासात स्थानिक अधिकार्‍यांकडून आकसापोटी कारवाई ची भूमिका घेतल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक अधिकार्‍यांकडून या प्रकरणाचा तपास न करता बाहेरच्या अधिकार्‍याकडे हा तपास देण्यात यावा, अशी सुद्धा मागणी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. 

त्याचप्रमाणे वरवंड येथील व्यक्तींविरुद्ध सुद्धा पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून डोंगर खंडाळ्यातील शांतता समितीच्या बैठकीत ठरलेलीच सर्व स्वीकाहर्या भूमिकेतून त्यांच्याविरुद्ध ची कारवाई सुद्धा त्वरित थांबवण्यात यावी व वरवंड येथील निरपराध नागरिकांना त्यामध्ये यापुढे गुंतवण्यात येऊ नये , अशी सुद्धा विनंती केली आहे. डोंगरखंडाळा येथील ग्रामपंचायत कडून पुतळा उभारण्यासाठी सादर करण्यात येणार्‍या प्रस्तावाच्या अनुषंगाने सुद्धा मान्यता देण्याबाबत ची कार्यवाही आचारसंहितेचे कारण समोर करून न थांबता पोलीस प्रशासनाने व जिल्हाप्रशासनाने जबाबदारी स्वीकारावी व त्वरित आवश्यक परवानगी द्यावी अशी मागणी सुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दरम्यान ग्रामपंचायत डोगरखंडाळाशी संपर्क साधून पुतळा बसविण्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे अत्यंत महत्वपूर्ण आवाहन देखील केले आहे.