Breaking News

व्यसनमुक्तीचे काम करणार्‍यांना सन्मानित करणे ही सामाजिक बांधीलकी-धुमाळ


श्रीगोंदे/प्रतिनिधी : समाजातील व्यसनाधीन वर्गासाठी जनजागृती व प्रबोधन कार्यशाळांचे आयोजन करून व्यसनमुक्तीचे काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित करणे हे सुद्धा एक सामाजिक बांधीलकी जपणारे काम आहे. असे कुकडी प्रकल्प अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी सांगितले.

मोहटादेवी सेवा प्रतिष्ठान व सनराईज पब्लिक स्कूल अ‍ॅड. ज्यु.कॉलेज श्रीगोंदेच्यावतीने विविध उपक्रमाद्वारे व्यसनमुक्ती जनजागृतीचे काम करणारे अरुण बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांना धुमाळ यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सनराईज सामाजिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी श्रीगोंदे नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.पी.लवांडे, सनराईज स्कूलचे संस्थापक सतीश शिंदे, अ‍ॅड.संतोष मोटे, अ‍ॅड.संदेश जायभाय, डॉ. बाळासाहेब बळे, डॉ.विजय जाधव, प्रशांत गोरे, सुनील वाळके व्यासपीठावर उपस्थित होते.

धुमाळ पुढे म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात येणार्‍या पिढीला सशक्त व आरोग्यदायी बनविण्यासाठी त्यांना आपुलकीने समाजावून व्यसनांच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी जनजागृती करणार्‍या कार्यकर्त्यांना अशा पुरस्कारातून व्यापक काम करण्याची प्रेरणा देण्याची आवश्यकता आहे. यावेळी कुस्तीपटू भाग्यश्री फंड, वीर पत्नी माधुरी गुंड, कृषी महादेव लंके, पत्रकारिता संजय काटे, शिक्षण देविदास शेटे, सामाजिक संस्था दत्ताजी जगताप, जीवन गौरव आदिक कदम यांनाही सनराईज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.