Breaking News

दुशेरेत बससेवा सुरळीत करण्याची मागणी


कार्वे,  (प्रतिनिधी) : दुशेरे गावात येणार्‍या एसटीची वेळापत्रक बदलण्यात आल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे. बारावी, दहावीची सध्या परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची गैरसोय होऊ लागल्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. कराड आगाराने तातडीने दखल घेऊन एसटीची वेळ पूर्ववत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन धावणार्‍या एसटीच्या ब्रीदवाक्याला दुशेरेकरांना मात्र वेगळाच अनुभव येऊ लागला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी नव्हे, तर स्वतःच्या सोयीनुसार एसटी धावत असल्याचा आरोप दुशेरे ग्रामस्थांच्या कडून होऊ लागला आहे.

सध्या बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून सकाळी सहा ते सायंकाळी नऊ या वेळेत येणारे बस वेळेवर न आल्यामुळे दुशेरे, कोडोली, शेरे कार्वे या परिसरातील 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विद्यालयात जा-ये करत आहेत. तसेच या परिसरातील ग्रामस्थांनाही कराड शहरात कामानिमित्त दररोज जावे लागते. शेतकर्‍यांना शेतीच्या मालाच्या विक्रीसाठी कराडला भाजी मंडईत एसटीमुळे सोयीस्कर होत असते.

दुशेरे गावात प्रवासासाठी दुसरे कोणतेही ही साधन नाही, प्रवाशांना केवळ एसटी बसवर अवलंबून राहावे लागते, असे असतानाही प्रवाशांच्या सोयीचा विचार करून एसटी बस वेळेत सोडण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

तसेच शनिवारी व रविवारी एसटी सेवा बंद असते, तरी पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दररोज 14 फेर्‍या शनिवारी व रविवारीही सुरू करण्यात यावी. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना कराडला येण्या-जाण्यासाठी सोय होईल.

त्यामुळे बससेवा पूर्ववत वेळेप्रमाणे एक तासाला सुरू करावी, अन्यथा कराड आगारात आंदोलन करण्याचा इशारा दुशेरे ग्रामस्थांनी दिला आहे.