Breaking News

विरोधकांकडून जवानांचे खच्चीकरण; मोदी यांची टीका; पुरावे देण्याबाबत मात्र मौन


पाटणा : पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. विरोधक या कारवाईचे पुरावे मागून आपल्या जवानांचे खच्चीकरण करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पुरावे देण्याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले.

पाटणा येथे आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना मोदी यांनी विरोधकांवर शरसंधान केले. ते म्हणाले, की भारतीय वायुसेनेने पाकिस्तानव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये घुसून ‘जैश ए मोहम्मद’च्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. सरकारने जवानांचे मनोबल वाढवले. सध्या दहशतवादाविरोधात आपण आपली एकजूट दाखवण्याची गरज आहे. त्याच वेळी दिल्लीत 21 पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात ठराव मांडत होते;

परंतु नागरिक या विरोधकांना माफ करणार नाहीत. भारत आता त्यांच्या वीरांच्या बलिदानानंतर पूर्वीसारखा गप्प बसत नाही. उलट ‘चुन चुन के बदला लेता है!’

काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी वायुसेनेने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे जगासमोर ठेवण्याची मागणी केली होती. त्याअगोदर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच शरद पवार यांनीही अशीच मागणी केली होती. जवानांच्या कर्तृत्त्वाबद्दल शंका नाही; परंतु अमेरिकेने जशी पाकिस्तानमधील ओबाटाबाद येथे घुसून अल-कैदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला ठार केले. त्यानंतर त्याला ठार केल्याचे पुरावे जगासमोर मांडले, तसेच भारत सरकारने करावे, अशी मागणी या नेत्यांनी केली होती. त्याबाबत बोलण्याचे मोदी यांनी टाळले. उलट, अशी मागणी करणारे नेते जवानांच्या मनोधैर्याशी खेळत आहेत, असा आरोप केला.

काँग्रेसकडून सातत्याने मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. राहुल गांधी प्रत्येक सभेत ‘चौकीदार ही चोर है’ अशी घोषणा देतात. यावर मोदी यांनी आज उत्तर दिले मोदी म्हणाले, की चौकीदार ‘चोर नही चौकन्ना है!’ आणि देशाला लुटणारे या चौकीदारामुळे हैराण आहेत.