इंग्लंडची भारतीय महिला संघावर मात


गुवाहाटी/वृत्तसंस्था: पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाला ४१ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. इंग्लंडच्या महिला संघाने दिलेल्या १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाला निर्धारित २० षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात ११९ धावांपर्यंत मजल मारता आली. तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत इंग्लंड संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. प्रभारी कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

इंग्लंडतर्फे सलामीवार फलंदाज टॅमी ब्युमोंटने ५७ चेंडूंना सामोरे जाताना सर्वाधिक ६२ धावा केल्या, तर कर्णधार हीथर नाईटने २० चेंडूंमध्ये ४० धावांची आक्रमक खेळी केली. इंग्लंडने २० षटकांत ४ बाद १६० धावांची मजल मारली.

ब्युमोंट व डॅनियल वॅट (३४ चेंडूंमध्ये ३५ धावा) या सलामीवीरांनी ८९ धावांची भागीदारी करीत इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार नाईटने अखेरच्या षटकांमध्ये २० चेंडूंमध्ये ७ चौकार लगावले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. फॉर्मात असलेल्या मानधनासह आघाडीच्या तीन फलंदाज २३ धावांत माघारी परतल्या होत्या. सीनिअर खेळाडू मिताली राज (११ चेंडू, ७ धावा) आणि पुनरागमन करणारी वेदा कृष्णमूर्ती (१५) यांची कामगिरीही निराशाजनक ठरली. अखेर दीप्ती (नाबाद २२), अरुंधती रेड्डी (१८) व शिखा पांड्ये (नाबाद २३) यांनी काही चांगले फटके लगावले, पण संघाला विजय मिळवून देण्यास ते पुरेसे नव्हते.

भारतीय संघाचा टी२० क्रिकेटमधील सलग पाचवा पराभव आहे. प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही. रमण यांना पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेपूर्वी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड (महिला) : २० षटकात ४ बाद १६० धावा (टॅमी ब्युमोंट ६२, हीथर नाइट ४०, डॅनियल वॅट ३५; राधा यादव २/३३.) वि.वि. भारत (महिला) : २० षटकात ६ बाद ११९ धावा (शिखा पांड्ये नाबाद २३, दीप्ती शर्मा नाबाद २२, अरुंधती रेड्डी १८; कॅथरिन ब्रंट २/२१, लिन्सी स्मिथ २/२२.)

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget