Breaking News

सविता देठे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवडपारनेर/प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी येथील शेतकरी कुटुंबातील विष्णु विठ्ठल देठे यांची स्नुषा व हरेश्‍वर कर्जुले येथील भास्करराव उंडे यांची कन्या व योगेश देठे यांची पत्नी सविता देठे/उंडे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने पारनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. तसेच बहिरोबावाडी गावच्या इतिहासात ही गावची प्रथम महिला पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी सन 2017 या वर्षी मुख्य परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असुन, या परिक्षेत बहिरोबावाडी येथील शेतकरी कुटुंबातील सविता योगेश देठे या महिलेची पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. त्यांना या परिक्षेत 100 वी रँक मिळाली असून त्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल किन्ही, बहिरोबावाडी, हरेश्‍वर कर्जुले या गावांसह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.