Breaking News

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा कृतज्ञता सोहळा


कराड/प्रतिनिधी : सातारा जिल्हा सहकारी पाणी पुरवठा संस्थांचा संघ मर्या., कराड यांच्यावतीने, महाराष्ट्र राज्य इंरिगेशन फेडरेशन, कोल्हापूर यांचे विशेष प्रयत्नाने महाराष्ट्रातील सहकारी पाणी पुरवठा संस्थांना वीज बिलामध्ये सवलतीचा दर मिळालेबद्दल प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा व जाहीर सत्कार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व कॉम्रेड सयाजीराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली सोमवार, दि. 11 रोजी दु. 3.00 वाजता अरण्या मंगल कार्यालय, उंब्रज, ता. कराड येथे आयोजित केला असल्याची माहिती सातारा जिल्हा पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील यांनी पत्राकद्वारे दिली.

या सोहळ्यास बाबासाहेब पाटील (भुयेकर), प्रताप होगाडे, संजय घाटगे, अरूण लाड, वैभव नायकवडी, विनय कोरे, पी. आर. पाटील, जे. पी. लाड, विक्रांत पाटील, रतन चौधरी-पुणे, एम. डी. शेलार, अंकुश जगताप, मनोहर शिंदे, दाजी जमाले-मुंढे, जगदीश जगताप-वडगांव हवेली, ऍड. रविंद्र पवार, ऍड. संभाजी मोहिते, युवराज जाधव व यशवंत हरी साळुंखे, ऍड. विकास जाधव-गांधीटेकडी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सन 1996 पासून महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून वेळोवेळी शासन दरबारी निवेदने, मोर्चे, मेळावे, उपोषण करून सहकारी पाणी पुरवठा संस्थांना सवलतीचे विजदर मिळवून दिलेले आहेत. त्यामुळे उपसा जलसिंचन लाभधारक शेतकरी वर्गास फायदा झाला आहे. युती शासनाने जून 2015 ला सहकारी पाणी पुरवठा संस्थांना मोठी वीज दरवाढ केली होती. त्यासाठी कोल्हापूर येथे रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे प्रशासनास वीज दरवाढ कमी करावी लागली व रूपये 1.16 दराने सवलतीचा दर लागू होणेबाबत शासनाने शासन निर्णय केला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गास दिलासा मिळाला.

या सोहळ्यास सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी, लाभधारक शेतकरी व सभासद यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकाश पाटील (बापू) यांनी केले आहे.