Breaking News

पारनेर तालुक्यातील पाच छावण्या जिल्हाधिकार्याकडून रद्द


पारनेर/प्रतिनिधी: पारनेर तालुक्यामध्ये सध्या 19 छावण्या सुरू असून त्यातील पाच छावण्या दि.14 रोजी जिल्हाधिकार्‍यांनी रद्द केल्याचे घोषित केले. यातील बर्‍याच छावण्या सुरू असून त्यातील जनावरांची संख्या सरकारी निकषा नुसार पूर्ण आहे. परंतू तहसीलच्या गलथान कारभारामुळे या छावण्या रद्द करण्यात आल्या असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

सरकारी पातळीवरून जनावरांसाठी छावण्या सुरू करण्यात आल्या असून तालुक्यामधून अद्याप पर्यंत 19 चारा छावण्यांना मंजुरी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मिळालेली आहे.

शेतकर्‍यांकडे असणार्‍या जनावरांना चारा मिळावा म्हणून छावण्या सुरू करण्यात आल्या आहे. परंतू त्यांची संख्या अजून मर्यादित आहे. अनेक गावांमध्ये छावण्या सुरू होणे अपेक्षित असून प्रस्ताव देखील प्रलंबित आहेत. परंतू त्या छावण्या सुरु करण्यासाठी जिल्हास्तरावरून मंजुरी मिळालेली नाही. अद्यापर्यंत तालुक्यातून संकल्प युवा प्रतिष्ठान भाळवणी, दुर्गामाता महिला मंडळ बुगेवाडी ता.पारनेर, श्री छत्रपती शिवाजी मजूर सहकारी संस्था मर्या रुई, छत्रपती पारनेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पारनेर यांची खडकवाडी, कर्जुले हर्या, रांजणगाव मशिद या ठिकाणी तर जगदंब ग्रामविकास सेवाभावी संस्था सुपा, श्रीदत्त बहुउद्देशीय संस्था जामगाव यांची लोणी हवेली येथे, जय हनुमान पाणलोट क्षेत्र विकास संस्था भोयरे गांगर्डा, राजमाता महिला सहकारी पतसंस्था पानोली, जिजामाता सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या वाढवणे, श्रीदत्त बहुउद्देशीय संस्था जामगाव, संगमेश्‍वर मजूर सहकारी संस्था मर्या पारनेर यांची बाबुर्डी येथे, शहीद अरुण बबनराव कुठे स्मृती प्रतिष्ठान वडनेर हवेली, राजे वरियर्स प्रतिष्ठान कडूस, राजीव गांधी सहकारी दुध उत्पादक संस्था मर्या अस्तगाव यांची पिंपरी गवळी येथे, शिवशाही प्रतिष्ठान अस्तगाव, श्री संत निळोबाराय प्रतिष्ठान रुई छत्रपती, कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर यांची टाकळी ढोकेश्‍वर येथे या 19 जनावरांच्या छावण्या सध्या तालुक्यामध्ये सुरू आहेत. दुष्काळाची दाहकता पाहता तालुक्यातील सर्वच गावांमध्ये छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

पारनेर तालुक्यातील राजमाता महिला सहकारी पतसंस्था पानोली, श्रीदत्त बहुउद्देशीय संस्था जामगाव, संगमेश्‍वर मजूर सहकारी संस्था पारनेर, शहीद अरुण बबनराव कुटे स्मृती प्रतिष्ठान वडनेर हवेली, राजे वरियर्स प्रतिष्ठान कडूस या 5 संस्था दिलेल्या आठ दिवसांमध्ये चालू केल्या गेल्या नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बंद करण्यात आल्या असल्याचे घोषित करण्यात आले होते. परंतु यातील पाचही छावण्या दि. 8 मार्च रोजी सुरू झाल्या असल्याचे तहसील कार्यालयाचे म्हणणे आहे. परंतु कलेक्टर ऑफिसवरून तहसील कार्यालयात छावण्या सुरू करण्याबाबतच्या पत्रामध्ये 5 मार्च असा उल्लेख आहे. त्यामुळे या पाचही छावण्या जिल्हाधिकार्‍यांनी रद्द घोषित केल्या आहेत.