Breaking News

ग्रामस्थांच्या पुढाकारातून विहिरीत पडलेल्या पाडसाला जीवदान


कर्जत/प्रतिनिधी: पाण्याच्या शोधात निघालेल्या हरणाच्या कळपातील पाडसाचा कुत्र्यांनी पाठलाग केल्याने ते विहिरीत पडले. ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने त्या पाडसाचे प्राण वाचवले. कर्जत तालुक्यातील देशमुखवाडीनजीक ही घटना घडली.

देशमुखवाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास कुत्र्यांनी हरणांच्या कळपाचा पाठलाग केला. या पाठलागात हरणे पळून गेली. मात्र, पाडसाला अंदाज न आल्याने ते आंधळकर यांच्या 60 फुट खोल विहीरीत पडले. येथील काही स्थानिक युवकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यावेळी वनखात्याच्या अधिकार्‍यांना संपर्क करण्यात आला. कर्जतचे वनक्षेत्रपाल गणेश छबिलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दादा धांडे, राशीनचे वनरक्षक दिलिप तोरडमल, वनमजूर उत्तम देवकाते, किसन नजन, विठ्ठल गवळी, राजेंद्र चव्हाण, व्ही.एन. उजागरे, आबा वाघमोडे सह ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशीरापर्यंत दोराच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.

 हरिण रेहकुरी येथिल काळवीट अभयारण्यात सोडणार असल्याची माहीती वनपाल धांडे यांनी दिली. देशमुखवाडीचे किशोर काळे, हनुमंत गदादे, सहदेव काळे, सोमेश्‍वर काळे याकामी मदत केली. उन्हाळ्यामुळे वन्यप्राण्यांना चारा पाण्याची टंचाई या काळात वनविभागाकडून प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात यावी अशी मागणी व्याख्याते बिभीषणकुमार यांनी केली आहे.