Breaking News

साहित्यातून जीवन जगण्याची प्रेरणा-डॉ. सांगळे


कर्जत/प्रतिनिधी : आई आपल्याला जन्म देते, तर भाषा आपल्याला घडविते. म्हणून भाषेला आपण मातृभाषा म्हणतो. साहित्यातून आपल्याला फक्त ज्ञानच मिळत नाही तर जीवनविषयक तत्त्वज्ञान मिळते. संस्कार मिळतात. संस्कृती समजते. जीवन जगण्याविषयी प्रेरणा मिळते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर यांचे साहित्य असे प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ. संदीप सांगळे यांनी केले.

येथील दादा पाटील महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज जयंती निमित्त आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाळ कांबळे होते. पत्रकार गणेश जेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. कांबळे म्हणाले की, जगात ज्या मान्यता पावलेल्या 14 भाषा आहेत. त्यापैकी मराठी एक आहे. जगात 11 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. त्यामुळे मराठी ही श्रेष्ठ भाषा आहेच. परंतु परकीय भाषांच्या आक्रमणात मराठीची जपणूक करणे हे मराठी भाषिकांचे कर्तव्य आहे. यासाठी वाचनावर जोर दिला पाहिजे. वाचनामुळे लेखन व उच्चारण सक्षम होण्यास मदत होईल.

यावेळी बोलताना जेवरे म्हणाले की, मातृभाषेतून शिक्षण ही आमची गरज आहे. यासाठी मातृभाषेवर प्रेम करा, तिची जपणूक करा, तिच्याविषयी गर्व बाळगा, तिचा प्रसार व प्रचार करा ती निश्‍चित आपले भवितव्य घडविल. कार्यक्रमाच्या सुरूवातीला कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त

महाविद्यालत निबंध, काव्यवाचन, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय कथाकथन व काव्यवाचन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नामवंत कवींच्या कवितांचे वाचन व कथाकथनाचा स्लाईड शो विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज, गोविंदाग्रज ग.दि.माडगुळकर यांच्या कवितांचे आणि पु.ल.देशपांडे यांच्या साहित्याचे सादरीकरण केले. म्हनींचे संकलन करून भित्तिपत्रक अंक प्रकाशित करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले.