Breaking News

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; भारताने पाडले आणखी एक ड्रोन; भारताचे पाकला आव्हान


बिकानेरः भारताने केलेल्या ‘एअर स्ट्राईक’नंतर पाकिस्तानच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. भारताने हेरगिरी करणारे पाकिस्तानचे ड्रोन पाडले असून त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. दरम्यान, हे ड्रोन कुठे पडले, याचा आता शोध घेतला जात आहे. राजस्थानमधील श्रीगंगासागर हिंदूमलकोट सीमारेषेजवळ सकाळी हे ड्रोन पाडले गेले आहे. भारतात हेरगिरी करण्यासाठी हे ड्रोन वापरले गेले होते. त्यावर भारतीय वायु दलाने ही कारवाई केली आहे; पण वायु दलाने याबद्दल अद्याप काहीही माहिती दिलेली नाही. गोळ्यांचे आवाज ऐकल्यानंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती.


सटे कोनी आणि खातलाबना या गावांजवळ ड्रोन पडले असावा असा अंदाज आहे. दरम्यान, गावकर्‍यांना याबद्दल काही माहिती मिळाल्यास कळवावी. तसेच संशयास्पद वस्तूला हात लावू नये असे आवाहन लष्कराने केले आहे. यापूर्वी देखील भारताने पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडले आहेत. 4 मार्च रोजीदेखील पाकिस्तानकडून भारतीय वायु क्षेत्रामध्ये घुसखोरी करण्यात आली. त्या वेळी 4 मार्च रोजी सकाळी 11:30च्या सुमारास राजस्थान सीमेजवळ एक अज्ञात विमान उडताना दिसले. ही माहिती मिळताच भारतीय वायुदलाकडून हे विमान पाडण्यात आले. भारतीय वायुदलाच्या सुखोई लढाऊ विमानातून मिसाईल सोडून त्याला खाली पाडण्यात आले. ड्रोन सारखे दिसणारे हे मानवरहित विमान पाकिस्तानच्या फोर्ट अब्बास परिसरात कोसळले. जे बाहवलपूरजवळ आहे. या कोसळल्या विमानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ट्विटवर ट्वीट करण्यात आले होते.

26 फेब्रुवारीच्या ‘एअर स्ट्राईकनं’तर पाकिस्तानने भारतात हेरगिरीचा प्रयत्न केला; पण कच्छ सीमेवर भारताने पाकिस्तानचे ड्रोन पाडले. दरम्यान, भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर दहशतवादी संघटनांवर कारवाई न केल्याबद्दल आरोपास्त्र सोडले आहे. तसेच भारतीय हवाई दलाने पाडलेल्या पाकिस्तानच्या एफ 16 विमानाचे पुरावे भारताकडे आहेत. जर पाकिस्तान भारताची दोन विमाने पाडल्याचा दावा करत असेल, तर ते याबाबतचे पुरावे आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर का शेअर करत नाही, असा सवाल भारताने केला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तान करत असलेल्या दाव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले. भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारताने हाणून पाडला. पाकिस्तान अद्याप पुलवामा हल्ल्यामागे ‘जैश-ए-मोहम्मद’ असल्याचे मान्य करायला तयार नाही. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना कोणत्याही अडथळ्याविना दहशतवादी कारवाया करत आहे. पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवरील दहशतवादी संघटना विरुद्ध ठोस कारवाई करायला हवी, असे त्यांनी नमूद केले आहे.