Breaking News

एसटी धावणार सीएनजीवर; डिझेलच्या तुलनेत एक हजार कोटी रुपये वाचणार


सोलापूर / प्रतिनिधीः
डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाला उर्जितावस्था आणण्यासाठी राज्यातील एसटी आता सीएनजीवर चालवण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे महामंडळाची एक हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले .

पंढरपूर येथे उभारण्यात येणार्‍या भक्त निवास व नवीन स्थानकाच्या भूमिपूजनप्रसंगी रावते बोलत होते. ते म्हणाले, की सीएनजीवर बस चालविल्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास टळणार आहे. राज्यातील 18 हजार बसमध्ये किरकोळ दुरुस्त्या केल्या, तरी त्या सीएनजीवर चालवल्या जाऊ शकतील. एसटी आपले स्वतः चे सीएनजी पंप सुरू करणार असून तेथे इतर सीएनजी ग्राहकांनाही त्यांच्या गाडीत सीएनजी टाकता येणार आहे. अशा पद्धतीने सीएनजीवर बस चालवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी येणार्‍या बसेसमधून मिळणार्‍या उत्पन्नातून महामंडळ कर्मचार्‍याचा पगार भागू शकतो, एवढी ही आषाढी यात्रा मोठी असल्याने यासाठी वेगळे नियोजन केले जात असल्याचे रावते यांनी सांगितले.


एसटी कर्मचार्‍यांच्या मुलांना आता 750 रुपयाचा पॉकेट मनी देण्याची योजना सुरू केली असून या मुलांच्या परदेशी उच्य शिक्षणाचा खर्च देखील महामंडळ उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. महामंडळ कर्मचार्‍याच्या मुलींसाठी 1 लाखाची ठेव ठेवण्याच्या योजनेचा आत्तापर्यंत 1 हजार कर्मचार्‍यांना लाभ झाल्याचेही रावते यांनी निदर्शनास आणले.

रायगड जिल्ह्यात एका बसमध्ये बॉम्ब सापडल्यानंतर उच्यस्तरीय बैठक घेण्यात आली. यापुढे असे करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचा निर्णय सार्वजनिक परिवहन विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला.

महामंडळातील भ्रष्ट टेंडर प्रक्रिया मोडून काढण्यासाठी राज्यातील सर्व बसस्थानकाच्या आवारात महामंडळामार्फत काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला असून बहुतांश कामे आता महामंडळातच केली जात असल्याचे रावते यांनी सांगितले.

विधान परिषदेतील वागणुकीचे समर्थन

विधानपरिषदेत सभापतींनी ज्या पद्धतीने परिचारक यांच्या निलंबनाचा विषय आणला, तो चुकीचा होता, असा गंभीर आरोप रावते यांनी केला. आपण जे वागलो, ते योग्यच होते, असे सांगत सभापतींचे पद सर्वोच्च असल्याने आपण माफी मागितल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, रावते यांच्या भेटीला माजी आमदार सुधाकर परिचारक आल्याचे निदर्शनास आणताच मी कोणालाच भेटलो नाही असे सांगत त्यांनी त्यावर भाष्य टाळले.