Breaking News

निवडणूक माध्यम केंद्राचे सातार्‍यात उद्घाटन


सातारा/ प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक-2019 ची आदर्श आचार संहिता दहा मार्चपासून सुरु झाली असून लोकसभा निवडणूक निर्भयपणे व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचार संहितेचे जिल्हा प्रशासनाकडून काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. कुठे आचारसंहितेचा भंग होत असल्यास ते पत्रकारांनी निदर्शनास आणावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्र्वेता सिंघल यांनी केले आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात लोकसभा निवडणूकीच्य पार्श्वभूमिवर प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी काल कार्यशाळा झाली. त्या वेळी त्या मार्गदर्शन करीत होत्या.

या कार्यशाळेस अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पूनम मेहता, जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामनिर्देशनपत्र जर ऑनलाईन भरले तर चुका होणार नाहीत. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र ऑनलाईन भरण्याबाबत सांगण्यात आले आहे, राजकीय पक्षांना प्रचारासाठी विविध परवाने घ्यावे लागतात. त्यासाठी एक खिडकी योजना जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांनी वेळोवेळी हिशोब देणे बंधनकारक आहे. राजकीय पक्षांना प्रचारसाहित्य प्रसारणासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. असे प्रमाणपत्र नसल्यास प्रचारास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल ऍप विकसीत केले आहे. या ऍपच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आदर्श आचारसंहितेच्या भंगाबाबत तक्रारी नोंदविता येणार आहेत. या ऍपवर तक्रार आल्यास 15 मिनिटात जेथे आचारसंहितेचा भंग होत आहे तेथे पथक पोहचणार आहे. त्यानंतर 100 मिनीटात तक्रारदाराला काय कार्यवाही केली आहे याची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवण्यात येणार आहे. या ऍपचा जास्तीत जास्त लाभ पत्रकारांनी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी सिंघल यांनी यावेळी केले.
निवडणूक काळात आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश असून उल्लंघन करणा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. निवडणूक प्रचारकाळात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रचारासाठी ध्वनीक्षेपकावर बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत प्रसारमाध्यमांवरून चुकीची माहिती प्रसारित होऊ नये व अफवांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्वाचे पाऊल उचलेले आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना फेसबुक, ट्वीटर, युटयूब, व्हाट्सअप आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार साहित्य प्रसारित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गठीत करण्यात आलेल्या सोशल मिडीया प्रमाणपत्र नियंत्रण केंद्राचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. असे प्रमाणपत्र नसल्यास सोशल मिडीयावरून प्रचारास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत दिव्यांगमतदारांसाठी विविध सुविधा देण्यात येणार आहे. मतदार यादीत महिलांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन महिलांची मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करण्यात आली असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे निवडणूक खर्चाची, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरन व सनियंत्रण समितीच्या कामजाची माहिती व कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने समाज मध्यमांवर प्रसारित होणार्‍या जाहिरातींच्या परवान्यांबाबत माहिती दिली.