Breaking News

फेब्रुवारीत विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देण्याची मागणी --------


राहाता/प्रतिनीधी : डिसेंबर व जानेवारी महिन्या प्रमाणेच फेब्रुवारी महिन्यात सुद्धा कांद्याचे भाव गडगडले होते. परिणामी या महिन्यातही शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका काद्यांत बसला असल्याने शासनाने कांदा अनुदान वाटपात फेब्रुवारी महिन्यात शेतकर्‍यांनी केलेल्या कांदा विक्रीस अनुदान द्यावे. अशी मागणी दहेगाव येथील शेतकरी संदीप डांगे व प्रदीप डांगे यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संदीप डांगे व प्रदीप डांगे यांनी म्हटले आहे की, डिसेंबर व जानेवारी महिन्यात कांद्याचे भाव घसरल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणले. कांद्याचे गडगडणारे भाव शेतकर्‍यांच्या डोळ्यात नेहमीच पाणी आणताहेत. यावर कुठेतरी छोटासा दिलासा म्हणून राज्य शासनाने 31 जानेवारी पर्यंतच्या शेतकर्‍यांनी केलेल्या कांदा विक्रीवर प्रतिक्विंटल दोनशे रुपयांचे अनुदान जाहीर केलेले आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यात विक्री झालेल्या कांद्याचे पोटी या अनुदानाचा लाभ शेतकर्‍यांना

मिळणार असल्याचे बोलले जाते. असे असले तरी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा कांद्याचे भाव हे अत्यंत कमी व गडगडले होते. फेब्रुवारी महिन्यात ज्या शेतकर्‍यांनी कांदा विक्री केली आहे. त्या शेतकर्‍यांचे सुद्धा मोठे आर्थिक नुकसान झाले असून कांद्याच्या कमी भावाचा फटका त्यांनाही बसलेला आहे. याचा विचार करता राज्य शासनाने शेतकर्‍यांना कांदा अनुदान देताना 28 फेब्रुवारी पर्यंत विक्री झालेला कांद्यास सुद्धा अनुदान द्यावे अशी मागणी राहाता तालुक्यातील दहेगाव येथील शेतकरी संदीप डांगे, प्रदीप डांगे, बाळासाहेब डांगे, अमोल गमे, सुरेश गमे, यांनी केली आहे.