Breaking News

जिल्ह्यात साडेतीन कोटींची विकासकामे मंजूर


सातारा,  (प्रतिनिधी) :  सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून रस्ते विकास निधी, खासदारांचा स्थानिक विकास निधी, जिल्हा नियोजन समिती आदी विविध मार्गाने विकासकामांचा धडाका सुरु आहे, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या 2515 या लेखाशिर्षाखालीसुध्दा खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून जिल्ह्यात 25 ठिकाणी एकूण तीन कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर करण्यात आलेल्या कामांचे आदेश आज ग्रामीण विकास मंत्रालयातून निर्गमित झाले आहेत. याकामी ना. पंकजा मुंडे- पालवे यांचे विशेष सहकार्य लाभले.

याबाबत जलमंदिर पॅलेस येथून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे नमुद केले आहे की, जिल्हयात विविध ठिकाणी मोठया प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातुन विकास कामे सुरु आहेत. लोकोपयोगी विकास कामे मार्गी लावण्यासाठी खा. उदयनराजे भोसले हे सातत्याने आग्रही असतात. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे, तसेच  ग्रामीण विकास मंत्री ना. पंकजा मुंडे व खासदार उदयनराजेंचा असलेला विशेष जिव्हाळा, यामुळेच उदयनराजेंनी केलेल्या शिफारशी ग्रामीण मंत्रालयाने महाराष्ट्र राज्याच्या 2515 या लेखाशिर्षामधुन मान्य केल्या आहेत. त्यानुसार सातारा जिल्हयात एकूण 25 ठिकाणी एकूण 3 कोटी 50 लाखांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. 

साडे तीन कोटींचा निधी मंजूर करणेकामी खासदार उदयनराजे भोसले यांनी कामांची शिफारस करुन, ना. पंकजाताई मुंडे यांचेशी दूरध्वनीवरुन चर्चा केली, शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती सुनील काटकर यांचा सातत्याचा पाठपुरावा, तसेच याकामी बाळासाहेब खरात, संग्राम बर्गे, शफी इनामदार, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रवीण धस्के, सुनील बर्गे, बाळासाहेब इथापे यांनी योग्य ते सहकार्य केल्यामुळे, साडेतीन कोटींची विविध विकास कामे एकूण 25 ठिकाणी मंजूर करण्यात आल्याचे आदेश ग्रामिण विकास मंत्रालयाने निर्गमित केले आहेत. ही विकास कामे आचारसंहितेच्या कचाटयात सापडू नयेत यासाठी आचारसंहितेपूर्वी सदर कामांचे कार्यादेश दिले जावून, लोकोपयोगी कामे मार्गी लागावीत, अशा सूचनाही खा. भोसले यांनी संबंधितांना दिल्या आहेत.