Breaking News

शिवसैनिकांनी काढली पदाधिकार्‍यांची उणीधूणी


सातारा / प्रतिनिधी : शिवसेनेच्या बुधवारी झालेल्या मेळाव्यात निष्ठावंत शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत काहीही करा; पण उपर्‍यांना तिकीट देऊ नका, भाजपला तर सातार्‍याची जागा आजिबात सोडू नका, असा एकच ठेका धरला. याबाबतची भूमिका त्यांनी उपनेते प्रा. नितीन बानुगडे- पाटील यांच्यासमोर मांडली. यावेळी या निष्ठावंतांनी पदाधिकार्‍यांची उणी-दुणीही बाहेर काढली. 

 शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माजी आमदार बाबूराव माने, माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, एस. एस. पार्टे, जयवंत शेलार, सचिन मोहिते, संजय मोहिते, प्रताप जाधव, अनिता जाधव, बाळासाहेब शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी बैठकीत प्रमुख पदाधिकार्‍यांना आपली मते मांडण्यास सांगितले. त्यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले, लोकसभेचा उमेदवार अगोदरच निश्र्चित करायला हवा होता. याबाबतची मागणी गेल्या दहा महिन्यांपासून आम्ही करत आहोत. का मतदारसंघ मूळचा सेनेचा असल्याने सातार्‍यातून निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात यावी. कोण पुरुषोत्तम जाधव? तिकीट देऊ नका, अशी मागणी पाटील यांनी केली. 

बैठकीत अनेक शिवसैनिकांनी उमेदवार आपला हक्काचा पाहिजे, महत्वाचे म्हणजे तो हाडाचा शिवसैनिक असावा, उपर्‍यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, निष्ठावंतांना डावलू नये, अशी जोरदार मागणी लावून धरली. सिनेमा, एसटी, बस तिकीट असल्यासारखे तसेच सत्यनारायणाचा प्रसाद असल्यासारखे उगवतात अन्‌ तिकीट मागतात अशांना दूर ठेवा, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली. सेनेत गट-तट असल्याने पैशाच्या जोरावर तिकीट मिळवतात आणि आपल्याला पराभवाचा सामना करावा लागतो, असे शल्य व्यक्त करत काही शिवसैनिकांनी पक्षाशी गद्दारी करणार्‍यांना थारा न देण्याचे आवाहन केले. 

दरम्यान, अनेक आजी-माजी पदाधिकार्यांनी शिवसेनेच्या जोरावर पैसा कमवला असल्याचे विधानही एका पदाधिकार्‍याने केल्याने बैठकीत कुजबुज सुरु झाली.निष्ठावंत शिवसैनिकांनी पदाधिकार्‍यांची उणी-दुणीही बाहेर काढल्याने या बैठकीची चर्चा शिवसेनेच्या वर्तूळात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. रात्री टाईट झाल्यावर यांचे फोन सुरू... प्रा. नितीन बानुगडे- पाटील मार्गदर्शन करायला उठणार एवढ्यात मेढ्याचे एस. एस. पार्टे यांनी आपल्याला बोलायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी आक्षेप घेतला. तुम्ही आतापर्यंत झोपला होता का? पक्षाचे काही प्रोटोकॉल असतात, असे जाधव म्हणाले. त्यावर हस्तक्षेप करत बानुगडे-पाटील यांनी पार्टे यांना बोलण्याची संधी दिली. 

पार्टे यांनी पालकमंत्र्यांवरच जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, पालकमंत्र्यांनी आमच्या जावली तालुक्यात आजपर्यंत एकही काम केले नाही. जिल्हाप्रमुखांसह इतर पदाधिकार्यांनीही पद घेण्यासाठी नावाला एक वर्ष ऑफिसेस उघडली आणि पद मिळाल्यानंतर ती बंद केली. एक प्रकारे पक्षाची फसवणूक केली गेली. पदाधिकार्यांचे सकाळचे फोन बंद असतात आणि रात्री टाईट झाल्यावर यांचे फोन सुरू होत असल्याचे सांगताच उपस्थित अवाक्‌ झाले. पार्टे यांच्या पवित्र्यामुळे बैठकीत खळबळ उडाली.