Breaking News

दखल वेगवेगळ्या समाजघटकांची नाराजी भाजपला भोवणार?


देशातील एकूण मतदारांत ब्राम्हणाचं प्रमाण साडेतीन टक्के असली, तरी हा वर्ग कायम संघ परिवाराशी आणि भाजपशी प्रामाणिक राहिला आहे. भाजपच्या पाठिराख्या असलेल्या या वर्गानं बर्‍याचदा आपली नाराजीही व्यक्त केली आहे. ज्या वेळी अशी नाराजी व्यक्त करण्यात आली, त्या वेळी त्याचा फटका भाजपला बसला आहे. आता ब्राम्हण, सिंधी आणि मारवाडी असे दोन्ही समाजघटक भाजपवर नाराज आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या उभारणीत अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा अनेक ज्येष्ठांचं मोठं योगदान आहे. त्यापैकी वाजपेयी तर दीर्घकाळ अंथरुणाला खिळून होते. त्यानंतर त्यांचं निधन झालं. अडवाणी यांनी रथयात्रा काढून भाजपचा विस्तार केला. त्याचा पाया मजबूत केला. गेल्या वेळी अडवाणी यांनाच पंतप्रधानपदाची संधी मिळेल, असं वाटत होतं; परंतु नरेंद्र मोदी यांना संधी मिळाली, तरीही अडवाणी नाराज झाले नाहीत. त्यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांची मार्गदर्शक मंडळावर वर्णी लावली. तिथं त्यांना काही कामच उरलं नाही. अडवाणी सातत्यानं निवडून येत असलेला मतदारसंघ या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासाठी घेण्यात आला. त्यालाही कुणाची हरकत नव्हती; परंतु अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला त्याबाबत स्वतः भेटून काही सांगावं, असं भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना वाटलं नाही. अडवाणी यांना नाही उमेदवारी दिली, तरी एकवेळ समजण्यासारखं आहे; परंतु त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणाला तरी उमेदवारी द्यायला हरकत नव्हती. भाजपच्या अन्य नेत्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आली. अडवाणी यांच्यासारख्याच्या वाट्याला ते ही समाधान नाही. अडवाणी यांना गांधीनगर मतदारसंघ द्यायचा नव्हता, तर इतर मतदारसंघात त्यांची वर्णी लावता आली असती. यापैकी काही करायचं नव्हतं, तरी भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सन्मानानं निवृत्ती द्यायला काहीच हरकत नव्हती; परंतु महाभारतात भीष्माला जर शरपंजरी होऊन बाणांच्या टोकावर पडून राहावं लागलं. तसं अडवाणी यांना आता उपेक्षांच्या बाणावर निपजत पडावं लागलं आहे. अडवाणी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत काहीच बोलणार नाहीत; परंतु सिंधी समाजाला आपल्या नेत्यावरचा हा अन्याय खटकतो आहे. कायम भाजपची पाठराखण करणारा हा समाज संख्येनं थोडा असला, तरी त्याची नाराजी भाजपला सहन करावी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भाजपनं वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पाठोपाठ पक्षाचे बुजुर्ग नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनाही लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी कानपूरमध्ये भाजपनं सत्यदेव पचौरी यांना उमेदवारी दिली असून, डॉ. जोशी यांनी समर्थकांना पत्र लिहून निवडणूक लढवणार नसल्याची माहिती दिली आहे. डॉ. जोशी हे विज्ञानाचे प्राध्यापक. वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मनुष्यबळविकास मंत्रालयाचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहिला होता. मागच्या वेळी निवडून येऊनही त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्वतःचा हक्काचा मतदारसंघ एका क्षणात सोडणार्‍या डॉ. जोशी यांना उमेदवारी द्यायची नव्हती, तर त्यांनाही ज्येष्ठ नेत्यांनी भेटून तसं स्पष्ट सांगायला हवं होतं. ते सांगण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. त्यांनाही सन्मानानं निवृत्त करता आलं असतं. अगोदर अडगळीत टाकायचं. मार्गदर्शक म्हणायचं आणि मार्गदर्शक हे पद केवळ शोभेपुरतं ठेवायचं. त्यामुळं अडवाणी यांच्याप्रमाणंच जोशी यांचाही अवमान झाला. वय हे कार्यक्षमतेचा निकष असू शकत नाही. भाजपनं अनेकांना जी मंत्रिपदं दिली, त्यातील किती जणांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटविला, असं विचारलं, तर हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकीच नाव घेता येतील. मग अडवाणी, डॉ. जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठांचा अवमान का केला, हा प्रश्‍न उरतो. अडवाणी यांच्यासारखा अन्याय सहन करून गप्प बसणार्‍यांतील डॉ. जोशी नक्कीच नाहीत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेशातील राजकारण जातीय वळणावर चालते. पूर्वी तेथील ब्राम्हण समाज, दलित समाज, मुस्लिम समाज हा काँग्रेसचा पाठिराखा होता. त्यातील एक एक घटक काँग्रेसपासून दुरावत गेला. त्यामुळं काँग्रेसची सध्याची अवस्था झाली आहे. मुस्लिम समाज हा मुलायमसिंह यादव यांच्यामागं होता; परंतु तो मागच्या निवडणुकीत भाजपबरोबर गेल्याचं दिसतं. आता मात्र हा समाज पुन्हा अखिलेश यांच्यामागं जाण्याची शक्यता आहे. इतर मागासवर्गीय समाजानं मोदी यांना साथ दिली. हिंदू मतांचं धु्रवीकरण करण्यासाठी मुझफ्फरनगरची दंगल उपयुक्त ठरली. आता तशी कोणतीही कारणं नाहीत. त्यामुळं हिंदू समाजातील एक एक घटक भाजपवर नाराज व्हायला लागला आहे. दलित समाज मायावती यांच्याबरोबर आणि काही प्रमाणात भीम आर्मीसोबत जाईल. देशात इतरत्र जरी साडेतीन टक्क्यांचा समाज म्हणून ब्राम्हण समाजाची ओळख असली, तरी उत्तर प्रदेशात हा समाज निर्णायक असतो. त्याचं प्रमाण दहा टक्के आहे. डॉ. जोशी जाहीर नाराजीमुळं हा समाज भाजपपासून दुरावण्याची शक्यता आहे. डॉ. जोशी यांच्या नाराजीमुळे उत्तर प्रदेशात भाजपला ब्राह्मण मतांचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आपण निवडणूक लढणार नसल्याची डॉ. जोशी यांनी भाजप मुख्यालयात येऊन घोषणा करावी, असा आग्रह त्यांना भेटून भाजपचे संघटन सरचिटणीस रामलाल यांनी केल्याचे समजतं; पण 85वर्षीय जोशी यांनी त्यांची मागणी धुडकावून लावली. ‘आपण निवडणूक लढू नये, असा निर्णय झाला असेल तर तसं शाह यांनी आपल्याला भेटून सांगायला हवं होतं’, अशी भावना जोशी यांनी व्यक्त केल्याचं समजतं.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं 21 मार्च रोजी जाहीर केलेल्या पहिल्या यादीतच अडवाणी यांचा पत्ता कापला होता. शिवाय कलराज मिश्रा, करिया मुंडा, शांताकुमार या पंचाहत्तरी पार केलेल्या उमेदवारांनाही तिकीट नाकारलं होतं. हुकूमदेव नारायण यादव यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली, तर भुवनचंद्र खंडुरी यांचे पुत्र काँग्रेसमध्ये गेल्यानं त्यांचाही विचार करण्यात आला नाही; पण डॉ. जोशी यांच्या उमेदवारीविषयी उत्सुकता कायम होती. रामलाल यांनी जोशी यांची भेट घेऊन कानपूर किंवा अन्य कुठल्याही मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं. आता लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या इंदूरमधील उमेदवारीविषयी भाजपश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडं लक्ष लागलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर अडवाणी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती; मात्र जोशी यांनी मतदारसंघातील आपल्या समर्थकांना पत्र लिहून कानपूर किंवा इतर कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचं कळवून नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात प्रियंका गांधी सक्रीय झाल्यानंतर दलित, मुस्लिम मतं त्यांच्याकंडं काही प्रमाणात आकर्षित झाला आहे. प्रियंका यांनी आपली प्रतिमा जाणीवपूर्वक सॉफ्ट हिंदुत्त्व जपणारी केल्यानं आता त्यांच्याकडं काही प्रमाणात हिंदू मतं वळू शकतात. तसंच डॉ. जोशी यांच्या नाराजीनं ब्राम्हण समाजाची मतंही त्यांना मिळू शकतात. तसं झालं, तर भाजपच्या उत्तर प्रदेशातील जागा निम्म्यानं कमी होऊ शकतात. एकीकडं ही स्थिती असताना दुसरीकडं मारवाडी समाजही भाजपवर नाराज झाला आहे. देशात मारवाडी समाजाला फक्त एकच प्रतिनिधित्त्व देण्यात आलं होतं. खासदार दिलीप गांधी यांच्यारुपानं ते संसदेत होतं. खा. गांधी तीनदा निवडून आले. काँग्रेसमधून आलेल्या डॉ. सुजय विखे यांच्यासाठी खा. गांधी यांचे पंख छाटण्यात आले. ज्यांनी खा. गांधी व भाजपवर टीका करण्यात आयुष्य घालविले, त्यांनाच पावन करून घेतले. खा. गांधी यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या उमेदवारीसाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन आलं. त्यांना जो अनुभव आला, त्यावरून मारवाडी समाजही भाजपवर नाराज झाला आहे. यापूर्वी खा. गांधी यांना डावलून प्रा. ना. स. फरांदे यांना जेव्हा उमेदवारी दिली होती, तेव्हा मारवाडी समाजानं नगरमध्ये भाजपला धडा शिकविला होता. आता हा समाजही नाराज आहे. त्याची नाराजी भोवते का, हे पाहायचं.