Breaking News

वृक्षतोड जोमात अधिकारी कोमात वरिष्ठांकडून माहिती देण्यास टाळाटाळ


शेवगाव/प्रतिनिधी
एकीकडे शेवगाव तालुक्यांमध्ये वृक्षतोड मोठ्या जोमात चालू आहे. तर दुसरीकडे वन अधिकारी मात्र, कोमात गेल्याचे सध्या शेवगाव व पाथर्डी वनक्षेत्रामध्ये पहावयास मिळत आहे. यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर जे झाड वाचून निसर्गाचे संवर्धन करायला पाहिजे. तेथे मात्र, अतोनात अनधिकृत वृक्षतोड होताना दिसत आहे. तर दुसरीकडे शेवगाव वनाधिकारी मात्र आपले हात ओले करताना लाकूड तोडणार्‍याकडून देण्याघेण्याच्या वादावरून शेवगांव वनअधिकारी यांना बेदम मारहाण होऊनही प्रकरण शेवगाव पोलिस स्टेशनला आल्यानंतर आपसात मिटून घेऊन नंतर अधिकारी हे रजेवर गेल्याचे समजते. याबाबत वरिष्ठांकडून पत्रकारांना माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे. तसेच पत्रकारांचे फोनही उचलले जात नाहीत. याबाबत मात्र, जनतेच्या मनात वरिष्ठांबद्दल संशय निर्माण झालेला आहे. भ्रष्टाचारी व कामचुकार तसेच आर्थिक संबंधात गुंतलेल्या भ्रष्ट अधिकार्‍याला वरिष्ठ पाठीशी घालत आहे का असा प्रश्‍न आता सर्वसामान्य जनता करत आहे.
आज रात्रंदिवस टेम्पोच्या साह्याने ताडपत्री टाकून तसेच आधुनिक यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणात अनधिकृत वृक्षतोड शेवगाव तसेच पाथर्डी तालुक्यामध्ये चालू आहे. परंतू या बाबींकडे वरिष्ठ जाणीवपूर्वक डोळेझाक करताना दिसत आहेत. अहमदनगर उपवनसंरक्षण यांचा छुपा पाठिंबा असल्याचे दिसत आहे. पाथर्डी तालूका व त्या सोबतच शेवगाव तालुक्याचेही वृक्षतोडीमुळे वाळवंट होताना दिसत आहे. दिवसेंदिवस कमी होणारे पर्जंन्यमान हे त्याचे लक्षणे आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमी व पशूप्रेमी यांनी पर्यावरणाला मोठा धोका असल्याचे सांगितले आहे.

शेवगावच्या क्रांती चौकांमधून ह्या लाकडाचे टेम्पो ताडपत्री लावून राजरोसपणे दिवसाढवळ्या व रात्री वाहतूक करताना दिसतात. परंतू शेवगावचे डी.वाय.एस.पी. यांच्या वाहतूक पथकाकडून मात्र, याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे लक्षात येत आहे. ह्या टेम्पोवर शेवगाव वाहतूक शाखेकडून कारवाई झालेली नाही. याबाबत सर्वसामान्य जनता शंका उपस्थित करत आहे.