Breaking News

दाखल - विखे मोठे, की पक्ष? पक्षावर निष्ठा ठेवली, की पक्ष पदं देतो, कदर करतो. पक्षाकडं त्यासाठी आग्रह धरावा लागत नाही; परंतु विखे यांची गणना निष्ठावान अशी नाही, तर कधीही निसटता येईल, असं त्यांचं व्य क्तिमत्त्व निसटावान म्हणून ओळखलं जातं. विखे ज्या पक्षात असतात, त्या पक्षाच्या विरोधात आघाड्या उघडतात, असा अनुभव तिसर्‍या पिढीतही अनुभवायला येतो.

बाळासाहेब, राधाकृष्ण विखे या पितापुत्रांनी काँग्रेस, शिवसेना असा प्रवास केला. ते काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या संस्थांच्या कार्यक्रमांना आवर्जून शिवसेना, भाजपच्या नेत्यांना बोलविलं जातं होतं. त्याचं कारण त्यांना सत्तेची जवळीक कायम हवी असते. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा असला, तरी विखे यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावतो. सत्तेतील लोकांशी जवळीक ठेवून अधिकार्‍यांमध्ये आपल्या संस्थांच्या तक्रारी असल्या, तरी डोळेझाक करा, असा संदेश देण्याचा प्रयत्न असतो. सत्तेशी जवळकीचे त्यांचे सूत्र राज्यातील फार थोड्या नेत्यांना गवसलं आहे. काँग्रेसमध्ये असताना भाजपशी चुंबाचुंबी करायचं त्यांचं तंत्र राज्याला चांगलंच माहीत आहे. गेल्या साडेचार वर्षापासून विखे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचा विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात कमी वावर आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनात जास्त वावर असं चित्र होतं. सत्ताधार्‍यांवर बेधडक आरोप करायचे आणि नंतर त्यांच्यांशीच जुळवून घ्यायचं हे विखे यांनाच जमतं. गेल्या साडेचार वर्षांत विखे यांनी राज्यातील सत्ताधार्‍यांवर आरोपांची जंत्री लावली. त्यातील किती आरोपांच्या मुळापर्यंत विखे पोहचले, हा संशोधनाचा मुद्दा आहे. नगरविकाससह अन्य बाबतीत त्यांनी किती तरी आरोप केले. विखे शिवसेनेवर जेवढया वेळेला तुटून पडले, त्याच्या पन्नास टक्के वेळा तरी भाजपवर तुटून पडले का? पडले असतील, तर मुख्यमंत्र्यांपासून भाजपच्या अनेक मंत्र्यांपर्यंत त्यांचा दोस्ताना कसा जमतो, या प्रश्‍नाचं उत्तर शोधावं लागेल. पक्षावर कुरघोडी करण्याची एकही संधी जशी विखे कुटुंब सोडत नाही, तसंच मित्रपक्षावरही कुरघोडी करायची संधी सोडत नाही. त्यांची वृत्ती माझं ते माझं आणि तुझं ते ते ही माझंच अशी असते. त्यामुळं तर सर्व सत्तास्थानं आमचीच असली पाहिजेत, अशी त्यांची भूमिका असते. नगर जिल्हा परिषदेत अडीच अडीच वर्षे सत्ता वाटून घ्यायची, दुसर्‍या टप्प्यांत सत्यजीत तांबे यांना ती द्यायची, असं ठरलं असताना तांबे यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळू नये, यासाठी त्यांनी जे राजकारण केलं, ते सर्वज्ञात आहे.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद या एकमेव सार्वजनिक क्षेत्रातल्या कामाचा डॉ. सुजय विखे यांना अनुभव. त्यांनी कोणत्या निवडणुका लढवाव्यात आणि कोणत्या नाही, हा त्यांचा अधिकार मान्य केलाच पाहिजे. त्यालाही हरकत घेण्याचं कारण नाही. गेल्या दोन वर्षांपासून सुजय विखे यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून तयारी चालविली होती. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयामार्फत त्यांनी आरोग्य शिबिरे घेतली. लोकांच्या आरोग्याची गेल्या दोन वर्षांपासून ते काळजी वाहत आहे. त्याबद्दलही त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय नगरला गेल्या दोन दशकांपासून आहे. त्या काळात अशी शिबिरं घ्यावीत, असं त्यांना का वाटलं नाही, असा छिद्रान्वेषी प्रश्‍न काही नतद्रष्ट विचारतील. त्यांना काय करायचं, ते करू द्यावं आणि आपण पुढं जात राहावं, असा सुजय यांचा हेतू असेल, तर त्यांच्या अशा प्रयत्नांनाही सलाम केला पाहिजे. जेव्हा आपण एखादं लक्ष्य समोर ठेवतो, ते साध्य करायचं असेल, तर त्यासाठी काय केलं पाहिजे, असं मनाशी योजतो. समजा एखादी सदनिका विकत घ्यायची असेल, तर आपण ती कोणत्या बांधकाम व्यावसायिकाची आहे, ती आपल्याला परवडेल का, याची किमान चौकशी करतो. संबंधितांची ती सदनिका विकायची इच्छा आहे का, याचा विचार करतो. त्याच्या घरात बळजबरीनं घुसत नाही. नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली असल्यानं तो मतदारसंघ राष्ट्रवादीनं काँग्रेससाठी सोडावा, यासाठी प्रयत्न करण्यातही काहीच चुकीचं नाही; परंतु तो मतदारसंघ सोडला नसतानाच दोन वर्षे अगोदर मतदारसंघ पिंजून काढण्याचं कारणच काय, असा प्रश्‍न कुणालाही पडू शकतो. एकतर हा मतदारसंघ राष्ट्रवादी सहजासहजी सोडेल, असा विश्‍वास त्यांना का वाटला, हा ही प्रश्‍नच आहे. केवळ पैसा असला, म्हणजे निवडणुका जिंकता आल्या असत्या, तर टाटा, बिर्ला आमदार, खासदार झाले असते. मतदारसंघ राष्ट्रवादीनं सोडला नाही, तर लगेच बी, सी प्लॅन तयार ठेवण्याच्या त्यांच्या नियोजनालाही सलाम केला पाहिजे; परंतु यात पक्षनिष्ठा कुठं बसते? लोकसभा निवडणूक कुठूनही लढविता येत असली, तरी मित्रपक्षावर कुरघोडी करून आपण आपल्याच पक्षाला अडचणीत आणतो आहोत, हे त्यांना वाटत नाही का? अर्थात यापूर्वी वारंवार कुरघोड्या केल्या असताना आता त्यात वावगं काहीच वाटणार नाही. एखाद्या पक्षाच्या वाट्याचा मतदारसंघ आपल्याला हवाच असेल, तर जेव्हापासून आपण हा मतदारसंघ पिंजून काढतो आहोत, तेव्हापासून त्या पक्षाच्या नेत्याला साकडं घातलं असतं, तर कदाचित त्यांचं मतपरिवर्तनही झालं असतं; परंतु मी तयारी करतो आहे, माझ्याकडे पैसा आहे, संघटन आहे, त्या जोरावर माझ्यासाठी तुम्हाला मतदारसंघ सोडावा लागेल, अशी भाषा रामदास आठवले यांच्या भाषेची आठवण करून देणारी आहे. सुुरुवातीला गांभीर्यानं अशी भाषा घेतली जाते; परंतु नंतर त्याकडं कुणी गांभीर्यानं पाहत नाही.
नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडं आहे. शरद पवार यांना भेटून, त्यांना पटवून, त्यांना सन्मान देऊन त्यांना विनंती केली असती, तर त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघ सुजय यांच्यासाठी सोडलाही असता. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यांशी मतभेद असतानाही जेव्हा आघाडीशिवाय पर्याय नाही, असं जेव्हा शरद पवार यांना वाटलं, तेव्हा त्यांनी राहुल यांंचं नेतृत्त्व मान्य केलं. त्यांच्यााबाबतची जी संदिग्धता होती, ती त्यांनी दूर केली. मोदी यांच्याशी असलेल्या निकटवर्तीयाचा शिक्का पुसून टाकला. पवार नगर जिल्ह्यात वारंवार आले. त्या त्या वेळी मूकपणे येऊन त्यांचा सत्कार करणं म्हणजे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायला आपल्याला जणू संमती दिली, असा त्याचा अर्थ नाही. प्रेमानं, आपुलकीनं एखादी गोष्ट मिळवता येते; परंतु हक्कानं ती मिळवण्याचा प्रयत्न केला, तर मग ती मिळण्यात अडचण येते. सामान्य जीवनात येणारा हा अनुभव विखे यांनाही आला असेल. शिवाय आपल्याला राष्ट्रवादीच्या ताब्यातील मतदारसंघ हवाच आहे, तर दोन वर्षांपासून प्रयत्न करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना बरोबर घ्यायला हवं होतं. इथं सवता सुभा करून पूर्वीच्या पद्धतीनं राजकारण करणं आणि राष्ट्रवादीवर टीका करणं सुरूच ठेवणार असाल, तर राष्ट ्रवादीनं तुमच्यासाठी हा मतदारसंघ का सोडावा, असा प्रश्‍न पडू शकतो. त्यात राज्यात भीषण दुष्काळी स्थिती आहे. नगर जिल्हाही त्याला अपवाद नाही. दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊ न वागायला हवं. सुजय यांचं राजकारण बाळासाहेबांच्याच पद्धतीनं चालतं. आपली यंत्रणा कामाला जुंपायची, तिनंच फटाके आणायचे, तिनंच शाली, हार आणायचे, तिनंच आगमनाच्या वेळी फटाके फोडायचे, ओल्या पार्ट्या झोडायच्या, असं चालणार असेल, तर दुष्काळग्रस्तांच्या भावनांशी आपण खेळतो आहोत, असं त्यांच्या लक्षात येत नाही. जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रभावती ढाक णे यांनी नेमकं सुजय यांच्या अशा कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला, हे चांगलं झालं.