Breaking News

व्यापार्‍यांच्यावतीने भाऊसाहेब थोरात यांची पुण्यतिथी साजरी


संगमनेर/प्रतिनिधी : थोर स्वातंत्र्यसेनानी व अमृत उद्योग समुहाचे संस्थापक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची नववी पुण्यतिथी संगमनेर तालुक्यातील सर्व व्यापारी बंधूंनी साजरी करत त्यांचा विचार कायम जपत काम करणार असल्याचे सांगून हीच खरी त्यांना आदरांजली असल्याचे सांगितले. शहरातील गांधी चौक, बाजारपेठ, मेन रोड, नेहरू चौक परिसरातील व्यापार्‍यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची पुण्यतिथी साजरी केली. यावेळी अशोकराव भुतडा, राधेशाम अग्रवाल, रमेश मेहता, टिनू ओहरा, सागर ओहरा, बंडू आसावा, सतिषराव मांडूळे आदी उपस्थित होते. 

यावेळी अशोकराव भुतडा म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हे जनसामान्यांसाठी लढणारे नेते होते. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेबरोबर शहराची बाजारपेठ त्यांनी फुलवली. आज अहमदनगर जिल्ह्यात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून संगमनेर शहराचा लौकिक आहे. याचे मूळ कारण तालुक्यातील सहकार, शैक्षणिक संस्था, प्रगतशील शेती व व्यापार उद्योग आहे. या सर्व विकासाचा पाया सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घातला असून आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संस्था देशात अग्रगण्य काम करत आहे. सर्वांनी स्व. भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करून आदरांजली अर्पण केली.