Breaking News

दखल- हस्तिनापुरातील महाभारत


दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) या दोन्हींत युती न झाल्यानं आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेस व ‘आप’ची युती झाली असती, तर भाजपचं आव्हान परतावून लावता येणं शक्य होतं; परंतु ‘आप’ बरोबर युती केली, तर काँग्रेसला त्याचा फटका बसेल, असं वाटल्यानं काँग्रेसनं ‘आप’ बरोबर युती न करण्याचा निर्णय घेतला. ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल भाजपविरोधी आघाडीत देशभर सहभागी होत असताना त्यांच्या होमपीचवर आता त्यांना दोन्ही आघाड्यांवर लढत द्यावी लागेल.

काँग्रेस देशभरात एक एक मित्रपक्ष जमवित असताना आता त्याच्या हातून अनेक मित्रपक्ष सुटायला लागले आहेत. लोकसभेच्या अगोदर निवडणूक युती करण्यापेक्षा निवडणूक पश्‍चात युती करण्यावर काँग्रेसचा भर आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या महत्त्वाच्या राज्यात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानं आघाडी करून काँग्रेसला आव्हान द्यायचं ठरविलं आहे, तर तिकडं पश्‍चिम बंगालमध्ये ममता दीदी काँग्रेसला बरोबर घेण्यास इच्छुक नाहीत. तीच गत केरळमध्ये. केरळमध्ये डावे आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता नाही. आता दिल्लीतही ‘आप’नं सहा उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यामुळं काँग्रेसला आता एकाकी लढत द्यावी लागेल. त्यावरून आता दोन्ही पक्षांत वाद सुरू झाला आहे. हस्तिनापुरातील हे महाभारत आता चांगलंच चर्चिलं जाईल. दिल्लीत ‘आप’ आणि काँग्रेस हातमिळवणी करणार असल्याची शक्यता काँग्रेसनं फेटाळून लावल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं भाजपसोबत छुपी आघाडी केल्याचं बोललं जात आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. भाजपविरोधी मतांची विभागणी करून काँग्रेस भाजपला मदत करत असल्याचं ते म्हणाले. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी तीनदा आघाडीसाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं होतं; परंतु काँग्रेसनं कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा केजरीवाल यांचा आरोप आहे. काँग्रेसनं प्रतिसाद दिला नाही, म्हणून गेल्या आठवड्यात ‘आप’ नं सहाही जागांवरचे उमेदवार जाहीर करून टाकले होते. त्यामुळं आता खरं तर ‘आप’ नं काँग्रेसवर टीका करण्याचं काहीच कारण राहिलेलं नव्हतं; परंतु ‘आप’ हा आक्रस्ताळ्या नेत्यांचा पक्ष झाला आहे. दिल्लीत ‘आप’ ला सरकार स्थापन करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याची किमंत काँग्रेसला नंतरच्या निवडणुकीत मोजावी लागली होती. त्यामुळं आता काँग्रेसनं ‘आप’ बरोबर युती करण्याचं टाळलं आहे. राहुल गांधी यांची सुरुवातीला ‘आप’ बरोबर युती करण्याची तयारी होती; परंतु काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह अन्य नेत्यांचा विरोध असल्यानं ही युती झाली नाही. काँग्रेसध्ये युती झाली असती, तर फूट पडणंही शक्य होतं. त्यामुळं काँग्रेसनं पक्ष वाचविण्यासाठी ‘आप’ला दूर ठेवलेलं असावं, असा अंदाज आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष शीला दीक्षित यांनी ‘आप’सोबत काँग्रेसची युती होणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती दिली. दिल्लीत लोकसभेसाठी ‘आप’आणि काँग्रेस 3-3 जागा विभागून घेणार असून 1 जागा अपक्षाला सोडणार अशा चर्चा होत्या. मंगळवारी दुपारी राहुल यांनी या युतीसंदर्भात दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि शीला दीक्षित या बैठकीस उपस्थित होत्या. दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांचा मताचा आढावा घेऊन राहुल यांनी या आघाडीचा निर्णय रद्द केला. अर्थात हा निर्णय म्हणजे केवळ औपचारिकता होती. आता केजरीवाल यांनी आकांडतांडव करण्यातही काहीच अर्थ नव्हता. त्याचं कारण त्यांनीच सहा उमेदवारांची नावं जाहीर केली होती. त्यामुळं ‘आप’ नं युती तोडण्याचा निर्णय अगोदर घेतला आणि काँग्रेसनं नंतर स्वतःचा मार्ग निवडला. गेल्या निवडणुकीत भाजपनं लोकसभेच्या दिल्लीतील सर्वंच सर्व म्हणजे सात जागा जिंकल्या होत्या. आताही भाजपचा तोच प्रयत्न राहणार आहे. दिल्लीत शीखांच्या झालेल्या हत्याकांडाचं आणि आता सज्जनकुमार या नेत्याला उच्च न्यायालयानं दिलेल्या शिक्षेचं भाजप भांडवल करणार, हे नक्की. ‘आप’ आणि काँग्रेसची युती होण्याच्या शक्यतेनं तर ‘आप’ च्या पंजाबमधील एका नेत्यानं ‘आप’ ला सोडचिठ्ठी दिली होती. काँग्रेसनं भाजपसोबत छुपी आघाडी केल्याच्या अफवा आहेत. दिल्लीत भाजप-काँग्रेस युतीशी लढण्यास ‘आप’तयार आहे. अशा अनैतिक युतीला जनता हरवेल, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे. श्रीमती दीक्षित यांनी ‘आप’सोबत हातमिळवणी करण्याच्या सगळ्या शक्यता धुडकावून लावत दिल्लीत काँग्रेस स्वबळावर लढणार असं आता म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि ‘आप’ दिल्लीत एकत्र लढताना दिसतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होता; मात्र या सगळ्या शक्यता फेटाळत दीक्षित यांनी काँग्रेस दिल्लीत स्वबळावर लढणार असं म्हटले आहे. काँग्रेसच्या या घोषणेनंतर आता दिल्लीत तिरंगी लढत पाहण्यास मिळणार आहे.

‘आप’ आणि काँग्रेस यांची हातमिळवणी होईल आणि या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपही योग्यपद्धतीने होईल अशी चर्चा होत होती; मात्र या सगळ्या शक्यता फोल ठरवत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आहे. बालाकोटमध्ये जो हवाई हल्ला भारतीय वायुदलानं केला, त्यानंतर दिल्लीत काँग्रेस आणि ‘आप’ हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकांसाठी एकत्र येतील, अशी चर्चा होती; मात्र यासंबंधी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या इतर नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर दिल्लीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं. दिल्ली विधानसभेत काँग्रेसचे आठ आमदार होते. ‘आप’ ला तीन आमदारांची गरज होती. काँग्रेसनं ‘आप’ ला पाठिंबा दिला. त्यानंतर हा पाठिंबा काढला. पुढच्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. ‘आप’ ला मात्र सत्तरपैकी 67 जागा जिंकता आल्या. तसं होऊ नये आणि कार्यकर्ते पक्षापासून दूर जाऊ नयेत, म्हणून आता ‘आप’शी युती न करण्याचा निर्णय काँग्रेसला घ्यावा लागला असल्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जर काँग्रेससोबत आमची आघाडी झाली, तर भाजप दिल्लीतील सर्व जागा हरेल. त्यामुळं काँग्रेससोबत आघाडीसाठी प्रयत्न करत आहे; मात्र काँग्रेसनं आघाडीसाठी नकार दिला आहे. त्यामुळं काँग्रेसला सारखं- सारखं विचारून मी आता थकलो आहे. मला कळतच नाही त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून आता दिल्लीत काँग्रेस आणि ‘आप’ मध्ये महाभारत सुरू झालं आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातून भाजपला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या आहेत. केजरीवाल आणि काँग्रेसचं आव्हान परतवणं त्यांना आता शक्य होणार आहे.